Donald Trump US truck driver jobs Indian truck drivers in USA impact: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधात कडक पावले उचलत आहेत. तसेच एच-१बी व्हिसावर निर्बंध लादून त्यांनी व्हाईट कॉलर नोकरदारांना अडचणीत टाकले होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या स्थलांतरित ट्रक चालकांच्या जागी अमेरिकन लष्करातील माजी सैनिकांना नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे भारतातून अमेरिकेत ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या दीड लाख जणांचा रोजगार धोक्यात आला आहे.
पेनसिल्व्हेनिया येथे बुधवारी व्हाईट हाऊसच्या लष्करी गुंतवणूक परिषदेत बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या मते, स्थलांतरितांपैकी बहुतेक ट्रक चालक अमली पदार्थ आणि मद्याच्या आहारी गेलेले आहेत. ते गुन्हे करत आहेत.
द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. गुंतवणूक परिषदेत बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन स्थलांतरित ट्रक चालकांवर देशव्यापी कारवाई करत आहे. बरेच ट्रक चालक देशात बेकायदेशीरपणे आले आहेत. त्यांच्याकडे ट्रक चालविण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि परवाने नव्हते.
“माझे प्रशासन लवकरच अवैध आणि विदेशी ट्रक चालकांविरोधात ऐतिहासिक कारवाई करणार आहे. हे ट्रक चालक अनेकांचे जीव घेत आहेत”, असे विधान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “या स्थलांतरित चालकांना रस्त्यावरील फलक वाचता येत नाहीत. त्यांच्यापैकी अनेकजण अमली पदार्थांचे सेवन करतात. ते मद्याच्या नशेत असतात. अशा लोकांनी रस्त्यावर वाहने चालवणे धोक्याचे आहे. ते अवैधरित्या देशात आले असून आम्हाला ते नको आहेत. पण दुर्दैवाने ते सध्या अमेरिकेच्या सर्व रस्त्यांवर वाहन चालवत आहेत.”
माजी सैनिकांना चालक म्हणून आणणार
स्थलांतरित ट्रक चालकांना बाजूला करून ट्रम्प यांना अमेरिकन लष्करातील माजी सैनिकांना हे काम द्यायचे आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, आम्हाला स्वाभिमानी अमेरिकन माजी सैनिकांना हे काम द्यायचे आहे. आम्ही आमच्या माजी सैनिकांना घेऊ, त्यांना यासाठी तयार करू आणि त्यांना ट्रक चालविण्यासाठी बरेच काही शिकवू.
लष्करात ज्या सैनिकांनी अवजड ट्रक चालवला आहे, असे अमेरिकन नागरिक व्यावसायिक चालक परवान्यासाठी आपोआप पात्र ठरतील, अशीही माहिती ट्रम्प यांनी दिली.
किती भारतीय ट्रक चालक धोक्यात
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, मार्च महिन्यात अवैध स्थलांतरितांविरुद्ध देशव्यापी मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाई अंतर्गत अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची परवानगी असलेल्या सुमारे दोन लाख स्थलांतरित चालकांचे परवाने रद्द करण्यात आले होते.
अमेरिकेत अलीकडच्या काळात ट्रक चालविण्याचा व्यवसाय कायदेशीर आणि बेकायदेशीर अशा दोन्ही स्थलांतरितांच्या गटात लोकप्रिय झाला आहे. मूळ अमेरिकन नागरिक ट्रक चालविण्याच्या कामात रस दाखवत नसल्यामुळे या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली होती. तसेच या कामात भरीव मोबदला मिळत असल्यामुळे स्थलांतरित मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे वळले.
डोनाल्ड ट्रम्प यांची नवी योजना अमलात आल्यास पंजाब आणि हरियाणामधील स्थलांतरितांचे नुकसान होऊ शकते. नॉर्थ अमेरिकन पंजाबी ट्रकर्स असोसिएशनच्या मते, अमेरिकेत ट्रक चालवणारे १,३०,००० ते १,५०,००० ट्रक चालक हे पंजाब आणि हरियाणाचे आहेत.
