अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तीव्र संघर्षाचे परिणाम जगभरात पाहायला मिळत आहेत. या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या समुद्र मार्गातून होणारी तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न जर केला तर अमेरिका इराणवर अत्यंत कठोर कारवाई करेल असे ट्रम्प म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी जर इराणने या जलमार्गात अडथळा निर्माण केला, तर अमेरिका त्यांच्याविरोधातील लष्करी कारवाई आणखी तीव्र करेल अशी धमकी दिली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी साधारणपणे पाचवा हिस्सा तेलाची वाहतूक याच जलमार्गातून होते, त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
“जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलाची वाहतूक रोखण्यासाठी काहीही कृत्य केले, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत वीस पटीने अधिक जोरदार हल्ला करेल,” असे ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
इतकेच नाही तर हा जलमार्ग रोखल्यास आपण इराणचे कायमस्वरूपी मोठे नुकसान करू अशी धमकीही ट्रम्प यांनी या पोस्टमधून दिली आहे.
“याशिवाय, आम्ही अशा सहजपणे उद्ध्वस्त करता येणारे लक्ष्य नष्ट करू, ज्यामुळे इराणला एक राष्ट्र म्हणून पुन्हा उभे राहणे अक्षरशः अशक्य होईल. त्यांच्यावर मृत्यू, आग आणि संतापाचा वर्षाव होईल. पण मी आशा आणि प्रार्थना करतो की, असे काही होऊ नये!”
ट्रम्प यांनी हेही नमूद केले की, होर्मुझ सामुद्रधुनीमधून समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीचा मार्ग सुरू राहिल्याचा, ऊर्जा पुरवठ्यासाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या देशांचा फायदा होईल.
“हे एक युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाकडून चीन आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या त्या सर्व देशांना दिलेली एक भेट आहे. मला आशा आहे की, या कृतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जाईल,” असे ट्रम्प पुढे म्हणाले आहेत.
अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे ग्लोबल शिपिंग आणि ऊर्जा बाजारपेठा मोठा धक्का बसलेला असताना ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यावसायिक वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
हा इराण आणि ओमान या दोन देशांना जोडणारा जलमार्ग ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने जागातील सर्वात महत्त्वाच्या जल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. आखाती देशांमध्ये उत्पादन होणाऱ्या तेलाचा खूप मोठा हिस्सा या मार्गाने इतर देशांपर्यंत पोहोचतो.
दरम्या अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तीव्र संघर्षामुळे जागतिक बाजारांत खनिज तेलाचे दर सोमवारी प्रतिबॅरल १२० डॉलरपर्यंत पोहोचले. याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारांत उमटले. मुंबई शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. रुपयाही आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण असल्यामुळे जगातील एक पंचमांश तेलपुरवठा विस्कळीत झाला आहे. आशियातील तेलपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. इराण दिवसाला १६ लाख बॅरल तेलाची निर्यात करतो. त्यातील बहुतांश निर्यात चीनला होते. चीनने हे युद्ध तत्काळ थांबविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे चीन इंधनपुरवठ्यासाठी इतर पर्याय शोधत आहे.
