इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये इराणच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट करत इराणला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हं आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्यांची इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांचे इतर विविध प्रतिनिधी यांच्याबरोबर बैठक झाल्याचे म्हटले आहे. ही बैठक अत्यंत उत्कृष्ट झाली आणि आमच्या दोन्ही देशांमधील दृढ संबंध कायम आहेत असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
या बैठकीत फार काही ठोस चर्चा झाली नसल्याचे ट्रम्प यांनी सांंगितले. तसेच इराणबरोबर करारासाठी वाटाघाटी सुरूच ठेवल्या पाहिजेत यावर आपण भर दिल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. “करार पूर्ण केला जाऊ शकतो का हे पाहण्यासाठी इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच ठेवल्या पाहिजेत, याबद्दल मी आग्रह धरण्यापलीकडे काहीही ठोस निर्णय झाला नाही. जर ते शक्य असेल, तर त्याला प्राधान्य दिले जाईल असे मी पंतप्रधानांना (नेतन्याहू) सांगितले आहे. जर ते शक्य नसेल तर त्याचा परिणाम काय होईल हे आपल्याला पाहावे लागेल. गेल्या वेळी इराणने करार न करणे चांगले, असा निर्णय घेतला होता, आणि त्यांच्यावर ‘मिडनाईट हॅमर’ हल्ला झाला होता… जे त्यांच्यासाठी चांगले ठरले नाही, यावेळी तरी ते अधिक समजूतदारपणाची आणि जबाबदार भूमिका घेतील अशी आशा आहे,” असे ट्रम्प म्हणाले आहेत. याबरोबरच आम्ही गाझा आणि एकूण प्रदेशात होत असलेल्या मोठ्या प्रगतीबद्दल चर्चा केली. मध्यपूर्वेत खरोखरच शांतता आहे, असेही ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ऑपरेशन ‘मिडनाईट हॅमर’ हे इराणच्या अण्वस्त्र बनवण्याच्या सुविधांचं नुकसान करण्यासाठी नियोजित करण्यात आलेली अमेरिकेची मोहिम होती. गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिकेने ही कारवाई केली होती. यामध्ये अमेरिकेन विमानांनी मध्यरात्रीच्या सुमारास इराणच्या आण्विक तळावर क्षेपणास्त्र डागली होती.
नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की दोन्ही नेत्यांनी इराण, गाझा आणि प्रादेशिक विकास याविषयांवर चर्चा केली. तसेच समन्वय राखण्यावर सहमती दर्शवली. तसेच वाटाघाटींच्या संदर्भात इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजांवर देखील यावेळी नेतन्याहू यांनी भर दिला, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमधून पुन्हा एकदा इराणला इशारा दिल्याने दोन्ही देशात तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
