Donald Trump On Iran : गेल्या एका महिन्यापासून अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे. २८ फेब्रुवारीपासून पेटलेल्या या युद्धाची धग अद्यापही कायम असून या युद्धात आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणच्या महत्वाच्या नेत्यांसह काही लष्करी अधिकाऱ्यांचा आणि शेकडो नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धाचा जगातील अनेक देशांवर आणि जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे.

या युद्धामुळे अनेक देशांत इंधनाचा तुडवडा जाणवत आहे. मात्र, तरीही अद्याप हे युद्ध थांबलेलं नाही. होर्मुझ सामुद्रधुनीमध्येही तणाव निर्माण होत असल्यामुळे जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. अखेर आता युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत. पण एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा, शांततेचा प्रस्ताव देण्याच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे इराणला सातत्याने धमकावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

ट्रम्प यांच्या या धमकीमुळे हे युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी इराण तयार नसून संपूर्ण युद्ध थांबण्यासाठी इराण आग्रही आहे. तसेच शस्त्रसंधी तात्पुरती असेल तर होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार असल्याची भूमिका इराणने मांडली. मात्र, इराणच्या या भूमिकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत इराणला मोठा इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितलं की ते इराणवर अत्यंत नाराज आहेत. यावेळी इराणबरोबरील युद्धाबाबत बोलताना ट्रम्प यांनी इशारा दिला की, ‘जर तेहरान करार करण्यास अयशस्वी ठरला, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. कारण त्यांनी स्वतःहून ठरवलेली अंतिम मुदत आता जवळ आली आहे.’ व्हाइट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हे भाष्य केलं आहे.

ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, इराणने अटी मान्य करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत ही मंगळवारची आहे. त्यामुळे जर त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, तर हे प्रकरण खूप लवकर संपू शकतं. त्यामुळे आता त्यांना काही गोष्टी कराव्याच लागतील. हे त्यांनाही माहिती आहे. आता तिथले लोक आधीच्या तुलनेत खूप अधिक समंजस आहेत’, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

शस्त्रसंधी तात्पुरती असेल तर होर्मुझ बंदच राहणार

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे प्रयत्न किती यशस्वी होतात याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित केले जात आहेत. या ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर इराणची भूमिका काय? याची माहिती आता समोर आली आहे. शस्त्रसंधी तात्पुरती असेल तर होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार, अशी भूमिका इराणने घेतली आहे.