अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांसह भारतावर आणखी २५ टक्के टॅरिफ लादला जाण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात इराणमध्ये आंदोलन सुरू आहे. आंदोलन मोडून काढण्यासाठी इराणने केलेल्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत ६०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमधील आंदोलकांविरोधात हिंसक कारवाई केल्यास अमेरिका हस्तक्षेप करेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. आता इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफ अस्त्राचा वापर केला आहे. इराणबरोबर चीनचा सर्वाधिक व्यापार असून त्यानंतर इराक, यूएई, तुर्कस्थान आणि भारत या देशांचा क्रमांक लागतो.
आंदोलन मोडून काढण्यासाठी इराणच्या सुरक्षा दलाने आंदोलकांविरोधात कारवाई केली तर अमेरिका थेट हस्तक्षेप करेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अहवालानुसार आंदोलनात आतापर्यंत ६०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी इराण विरोधात लष्करी कारवाई करण्याच्या पर्यायाचा विचार करत असल्याचे म्हटले होते. तसेच इराणने आता ‘रेडलाइन’ पार केल्याचे ट्रम्प म्हणाले होते. इराणमध्ये महागाईचा भडका उडाल्याने आंदोलन सुरू आहे. इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफ अस्त्र काढले आहे.
२५ टक्के टॅरिफ लादणार – ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट शेअर करत इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांना इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, “इराणबरोबर व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला अमेरिकेशी व्यापार करताना २५ टक्के टॅरिफ लावला जाईल, टॅरिफ लावण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी केली जाईल.” इराणबरोबर चीनचा सर्वाधिक व्यापार आहे. त्यानंतर इराक, यूएई, तुर्कस्थान आणि भारत या देशांचा क्रमांक लागतो. त्यामुळे भारतावर देखील ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफची टांगती तलवार आहे. सध्या अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय मालावर अमेरिकेकडून ५० टक्के टॅरिफ आकारला जात आहे.
इराणवर हवाई हल्ला करण्याचा इशारा
व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट म्हणाल्या, इराणबरोबर राजनैतिक चर्चा करण्यावर ट्रम्प यांचा भर आहे. लष्कराचा वापर करण्याचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध पर्यायांपैकी एक आहे. ट्रम्प यांना योग्य वाटत असल्यास ते लष्कराचा वापर करण्यास अनुमती देऊ शकतात. दरम्यान, मागील वर्षी इराणमधील तीन अणुतळांवर अमेरिकेने हवाई हल्ला केला होता. त्यावर बोलताना लेविट म्हणाल्या, अमेरिकेच्या हवाई हल्ल्याबाबत इराणला जितकी कल्पना आहे तितकी इतर कोणत्याही देशाला नाही.

