रॉयटर्स, दुबई, वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी आणि शांततेचा करार करण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, तत्पूर्वीच इराणवर हल्ले सुरू झाले आहेत.

इस्रायलच्या लष्कराने शिराझ येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हल्ला केला. तसेच त्यांनी रेल्वे परिसर मोकळा ठेवण्याचे आवाहन इराणमधील जनतेला केले आहे. यामुळे युद्ध चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने मंगळवारी सकाळी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्रे डागली. या क्षेपणास्त्रांचे अवशेष ऊर्जा प्रकल्पांजवळ पडले.

आज रात्री संपूर्ण इराणी संस्कृती बेचिराख करण्याचा इशारा ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर दिला. तथापि, इराणमध्ये संपूर्ण सत्ताबदल झाला आहे. त्या ठिकाणी वेगळे, हुशार आणि कमी मूलतत्त्ववादी आता आले आहेत. त्यामुळे काही तरी क्रांतिकारी आणि आश्चर्यकारक घडू शकते. आम्ही आज रात्री मार्ग काढू. जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील हा अतिशय महत्त्वाचा क्षण असेल असे त्यांनी नमूद करत संभ्रम वाढवला.

ट्रम्प इराणला सातत्याने इशारे देत आहेत. ‘होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा अन्यथा तुम्हाला नरकयातना भोगाव्या लागतील,’ असा इशारा नुकताच दिला. पत्रकार परिषदेत सोमवारी त्यांनी इराणमधील प्रत्येक पूल, ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त केला जाईल असा इशारा दिला. तसेच ‘संपूर्ण इराण एका रात्रीत नष्ट करता येईल आणि ही रात्र कदाचित उद्याचीच असेल,’ असेही ते म्हणाले.

इराणने सौदी अरेबियातील जुबैल पेट्रोकेमिकल संकुलावर मोठा हल्ला केला. सौदी अरेबियासह विविध देशांची अब्जावधींची गुंतवणूक या ठिकाणी आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने ही माहिती दिली. इराणच्या असालूयेह पेट्रोकेमिकल प्रकल्पावरील हल्ल्याला दिलेले हे प्रत्युत्तर असल्याचे इराणने म्हटले आहे.

दरम्यान, इराणने पूर्व सौदी अरेबियातील ऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध केला आहे. ‘‘या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक धोकादायक होऊन चिघळेल,’’ असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि सौदी अरेबियाला पाठिंबा असल्याचे सांगितले.

इराणचे ऊर्जा प्रकल्पांभोवती मानवी साखळीचे आवाहन

ट्रम्प यांनी इराणला दिलेली मुदत मंगळवारी संपुष्टात येत आहे. तत्पूर्वीच इराणमध्ये जोरदार हवाई हल्ले झाले. तेहरानमधील नागरी भागही लक्ष्य झाले. यात ३० ते ४० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन इराणने केले आहे. इराणने यापूर्वी आण्विक प्रकल्पांना धोका निर्माण झाला असताना त्याभोवती मानवी साखळी केली होती. दरम्यान, इराणनेही इस्रायल आणि सौदी अरेबियावर क्षेपणास्त्रांचा मारा केला.

इराणने प्रस्ताव फेटाळला

इराणने मध्यस्थांकरवी दिलेला शांततेचा प्रस्ताव फेटाळला आणि अमेरिकेबरोबर चर्चेसाठी अटी समोर ठेवल्या आहेत. अमेरिका-इस्रायलने तातडीने हल्ले थांबवावेत आणि पुन्हा हल्ले करणार नाही, याची हमी द्यावी, इराणला नुकसानभरपाई द्यावी; तसेच होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करणार्या नौकांकडून शुल्कवसुली करू द्यावी अशा अटी इराणने चर्चा सुरू करण्यासाठी समोर ठेवल्या आहेत.

रशिया, चीनचे ठरावाविरोधात नकाराधिकार

संयुक्त राष्ट्रे : रशिया आणि चीन या इराणच्या मित्र देशांनी, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाविरोधात मतदान केले. ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपण्याच्या काही तास आधी हा ठराव बहारिनकडून मांडण्यात आला. ठरावाच्या बाजूने ११, विरोधात दोन मते पडली तर दोन सदस्य गैरहजर राहिले. दुसरीकडे, हा ठराव मंजूर झाला असता तरी त्याचा खरोखर काही परिणाम झाला असता का, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

‘१.४० कोटी इराणी हौतात्म्यासाठी तयार’

दुबई : आपल्यासह १.४० कोटी इराणी युद्धात शहीद व्हायला तयार आहेत असे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एक्सवर लिहिले आहे. इराणची एकूण लोकसंख्या नऊ कोटी इतकी आहे.

अन्य घडामोडी

  • अमेरिकेने इराणमधील खर्ग बेटावर हल्ले, येथील तेलाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले नसल्याची माहिती दिली.
  • नागरी आणि ऊर्जेसंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे युद्ध नियमांविरुद्ध – फ्रान्स
  • युद्ध संपविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न संवेदनशील टप्प्यावर येऊन थांबले आहेत, असे इराणचे पाकिस्तानमधील राजदूतांचे वक्तव्य.
  • इराणच्या अलबॉर्झ प्रांतात हवाई हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू.