अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम झालेला आहे. मात्र, तरीही दोन्ही देशांत तणावाचं वातावरण आहे. हे युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी दोन्ही देशांत पाकिस्तानच्या माध्यमातून शांतता कराराच्या हालचाली सुरू आहेत. पण अद्याप शांतता करारावर अमेरिका आणि इराणने सहमती दर्शविलेली नाही. यातच होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने नाकेबंदी सुरू केल्याने तेथेही तणाव आहे आणि याचाच फटका जगातील अनेक देशांच्या जागतिक व्यापारांना बसत आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनीमधून जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत.
या घडामोडी सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणला दररोज धमकीवजा इशारा देत वेगवेगळी वक्तव्य करत असल्याने अमेरिका आणि इराणमधील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह निर्माण होत आहेत. आता अशाच प्रकारचं एक वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलं आहे. त्यामुळे हे युद्ध संपणार की पुन्हा भडकणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
‘इराणने करारावर सहमती दर्शवली नाही, तर बॉम्बहल्ला सुरू होईल आणि तो पूर्वीपेक्षा खूप भीषण असेल’, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “जर इराण सध्याच्या अटी मान्य करत असेल तर ‘एपिक फ्युरी’ संपेल आणि प्रभावी नाकेबंदी उठवली जाईल. त्यामुळे इराणसह सर्वांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गावरील परिस्थिती सामान्य होईल. मात्र, जर इराण करारासाठी सहमत झालं नाही, तर बॉम्बहल्ला सुरू होईल आणि दुर्दैवाने तो पूर्वीपेक्षा खूपच जास्त तीव्र आणि भीषण असेल”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ थांबवला
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच दिले होते. इराणबरोबर सुरु असलेल्या युद्ध समाप्तीबाबतच्या वाटाघाटी पुढे सरकल्या असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यामुळे शिवाय, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना संरक्षण देणारा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ट्रम्प यांनी स्थगित केला.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये, इराणच्या प्रतिनिधींसोबत अंतिम कराराच्या दिशेने प्रगती झाली असल्याचे सांगितलं होतं. “पाकिस्तान आणि इतर देशांनी केलेल्या विनंतीनंतर आमच्या इराणविरोधातील लष्करी प्रयत्नांना यश मिळाले आहे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.“महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण आणि अंतिम करार करण्याच्या दिशेने इराणच्या प्रतिनिधींसोबत सुरु असणारी चर्चा पुढे सरकली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम राहील यासाठी दोघांनी संमती दर्शवली आहे. दरम्यान, अंतिम करारावर स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना संरक्षण देणारा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात येत आहे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
