Donald Trump Iran Military Strike Warning: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पाकिस्तानमध्ये फिस्कटलेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर उभय देशात पुन्हा चर्चा झालेली नाही. इराणकडून देण्यात येणारे प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प धुडकावून लावत आहेत. अशात इराणवर पुन्हा एकदा लष्करी हल्ला करावा लागू शकतो, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिले आहेत. इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यापासून अवघा एक तास दूर होतो, असाही खुलासा ट्रम्प यांनी केला. आखाती देशांच्या विनंतीमुळे नियोजित हल्ला पुढे ढकलल्याचे ट्रम्प म्हणाले.

केवळ एक तास दूर होतो – ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ​व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आजच इराणवर कारवाई करण्याचा विचार होता असा खुलासा त्यांनी केला. “हल्ल्याचा घेण्यापासून मी केवळ एक तास दूर होतो,” असे ट्रम्प म्हणाले. “इराणचे नेते युद्धबंदीच्या करारासाठी विनंती करत आहेत. येत्या काही दिवसांत करार न झाल्यास अमेरिका पुन्हा एकदा मोठा हल्ला करू शकते”, असा इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला. इराणकडे अत्यंत मर्यादित वेळ त्यांच्याकडे शिल्लक असल्याचे सूचक विधान देखील ट्रम्प यांनी केले.

इराणकडे वेळ कमी – ट्रम्प

​रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, “माझ्या मते पुढील दोन-तीन दिवस, कदाचित शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीचा काळ… अत्यंत मर्यादित वेळ त्यांच्याकडे (इराणकडे) उरलेला आहे. कारण आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत नवीन अण्वस्त्र तयार करू देणार नाही,” असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ​गेल्या आठवड्यात देखील ट्रम्प यांनी इराणकडे मर्यादीत वेळ शिल्लक असल्याचे वक्तव्य केले होते. इराणसाठी घड्याळाचे काटे वेगाने फिरत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. होते.

इराणचा अमेरिकेला इशारा

इराणवर नियोजित लष्करी हल्ला अखाती देशांच्या विनंतीवरुन रद्द केल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या मध्यपूर्वेतील प्रमुख अमेरिकन मित्रराष्ट्रांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर हा हल्ला तूर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, इराणने देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केल्यास, अमेरिकेविरुद्ध युद्धाच्या नवीन आघाड्या उघडल्या जातील, असे इराणच्या लष्कराने ट्रम्प प्रशासनाला इशारा दिला आहे.

इराणचा नवा प्रस्ताव

दरम्यान, आयआरएनए या इराणी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने युद्धसमाप्तीसाठी अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात इराणवर अमेरिकेकडून लादण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गोठविण्यात आलेला निधी सोडण्यात यावा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत असणारे अमेरिकेची नाकेबंदी हटविण्याची मागणी करण्यात आलीय. याशिवाय युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणे, इराणच्या जवळच्या भागांतून अमेरिकी सैन्य माघारी घेणे आणि लेबनॉनसह इतर भागातील संघर्ष समाप्त करण्याच्या अटींचा प्रस्तावात समावेश आहे, असे आयआरएनएच्या वृत्तात म्हटले आहे.