अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या कराराबाबत एक मोठे विधान केले आहे. “इराणसोबतच्या वाटाघाटी एका चांगल्या कराराच्या दिशेने पुढे सरकत आहेत, पण कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रे बनवू दिली जाणार नाहीत,” असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. लारा ट्रम्प यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी या घडामोडींवर भाष्य केले.
घाई केली तर चांगला करार होणार नाही
चर्चेच्या प्रगतीबद्दल बोलताना ट्रम्प यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आम्ही एका अतिशय चांगल्या कराराच्या जवळ पोहोचलो आहोत. जर आपण खूप घाई केली, तर चांगला करार होऊ शकत नाही. हळूहळू का होईना, आम्हाला जे हवे आहे ते आम्ही मिळवत आहोत. पण, जर आम्हाला जे हवे आहे ते मिळाले नाही, तर आम्ही हा विषय ‘वेगळ्या पद्धतीने’ संपवू.” ट्रम्प यांच्या या ‘वेगळ्या पद्धतीच्या’ विधानामुळे चर्चां आता आणखी वाढल्या आहेत.
इराणच्या लष्कराला का सोडले? ट्रम्प यांनी सांगितले कारण
मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी एक धक्कादायक खुलासा केला. अमेरिकेने इराणच्या नौदल आणि हवाई दलाला १००% उद्ध्वस्त केले असले, तरी तिथल्या भूदलाला (लष्कराला) जाणीवपूर्वक लक्ष्य केले नाही. याचे कारण स्पष्ट करताना ट्रम्प म्हणाले, “इराणच्या लष्करातील काही विभाग थोडे मवाळ विचारसरणीचे आहेत, असे आम्हाला वाटते. एखाद्या देशाची संपूर्ण व्यवस्थाच नष्ट केली, तर त्याचे दीर्घकालीन गंभीर परिणाम होतात. युद्धात संपूर्ण देशालाच संपवून टाकण्याची चूक पूर्वी झाली आहे, ज्यामुळे तो देश ४० वर्षे उभा राहू शकला नाही. इराकचे काय झाले ते आपण पाहिलेच आहे.”
अमेरिकन मीडियावर संताप
डोनाल्ड ट्रम्प यांनी या वेळी अमेरिकेतील प्रसारमाध्यमांवर जोरदार टीका केली. “इराणची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपल्या देशातील ‘फेक न्यूज मीडिया’ आहे,” असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेला मिळालेले मोठे विजय मीडिया लपवत असल्याचा दावा करत ट्रम्प म्हणाले, “आम्ही इराणचे संपूर्ण नौदल संपवले, तरीही मीडिया सांगतोय की त्यांचे नौदल उत्तम काम करत आहे. आपल्याकडे निष्पक्ष मीडिया नाही, ते फक्त खोटे बोलतात.”
अद्याप अंतिम निर्णय नाही
व्हाईट हाऊसमध्ये शुक्रवारी दोन तास चाललेल्या बैठकीनंतरही अमेरिका आणि इराणमध्ये कोणताही अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. व्हाईट हाऊसच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत हा करार “अमेरिकेच्या हिताचा” आणि राष्ट्राध्यक्षांच्या अटींनुसार असणार नाही, तोपर्यंत ट्रम्प त्यावर स्वाक्षरी करणार नाहीत. ट्रम्प या करारावर अंतिम निर्णय घेणार असले, तरी इराणनेही अद्याप कोणत्याही अंतिम कराराला संमती दिलेली नाही.
