Donald Trump issues final warning to Iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत आपली कडक भूमिका मांडली असून, इराणी प्रतिनिधींच्या वागणुकीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. इराणचे वाटाघाटी करणारे प्रतिनिधी अत्यंत “वेगळे” आणि “विचित्र” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा इशारा दिला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, वाटाघाटी करणारे इराणचे अधिकारी वेगळे आणि विचित्र आहेत. लष्करीदृष्ट्या इराणचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या पुनरागमनाची शक्यता सध्या शून्य आहे. अशा परिस्थितीत इराणने करारासाठी अमेरिकेकडे “विनवणी” (begging) करत असून जी त्यांनी करायलाच हवी; मात्र सार्वजनिकरित्या ते केवळ अमेरिकेच्या प्रस्तावावर “विचार करत असल्याचे” भासवत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुढे इशारा देताना म्हटले आहे की, इराणने लवकरात लवकर या प्रक्रियेला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. जर वेळ निघून गेली, तर पुन्हा मागे फिरता येणार नाही आणि त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती कोणासाठीही “सुखद” नसेल. ही एक प्रकारे इराणला दिलेली शेवटची संधी असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

युद्ध थांबणार कधी?

दरम्यान, युद्ध समाप्तसाठी इराणबरोबर चर्चा सुरू असल्याचं समोर आलंय. मात्र, या चर्चांना कोणताही पूर्णविराम मिळत नसल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. इराणने आखाती देशांना लक्ष्य केल्याने आखातातून भारतात येणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतात थेट सामान्य नागरिकांना युद्धाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अमेरिकेने हे युद्ध थांबवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांना दिली.

तर, इस्रायलच्या हल्ल्यात इराणचा आणखी एक मोठा अधिकारी ठार झाला आहे. इराणच्या नौदलाचे प्रमुख अलीरेझा तंगसिरी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे. इराणच्या शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) नौदल विभागाचे नेतृत्व करणारे तंगसिरी, बंदर अब्बास या शहरात झालेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. इराणने मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.