Donald Trump warns Netanyahu on Israel Iran war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पश्चिम आशियात तीन महिन्यांपासून चालू असलेले इराण युद्ध लवकर संपवायचे आहे. ॲक्सिऑसने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांना आता लष्करी संघर्ष वाढवायचा नाही. युद्धाच्या १०० दिवसांनंतरही ट्रम्प इराणने करार करावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर गेल्या २४ तासात इस्रायल आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणावही कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यासाठी त्यांनी नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला.
रविवारी इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतवर नव्याने हल्ले केले. हेजबोलाशी संबंधित असलेल्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात आले. ॲक्सिऑसने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने अमेरिकेच्या लष्करी यंत्रणेला या हल्ल्याची माहिती दिली होती. मात्र व्हाईट हाऊसला कोणतीही आगाऊ सूचना दिली नव्हती.
लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि इराणने हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले. इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला.
ट्रम्प यांचा नेतान्याहूंना इशारा
या घडामोडीनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ॲक्सिऑसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. रविवारी दोन्ही नेत्यांमध्ये फोनद्वारे संभाषण झाले. “बीबी, तुम्ही सावध व्हा. नाहीतर लवकरच तुम्ही एकटे पडाल”, असा इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला. नेतान्याहू यांचे टोपण नाव ‘बीबी’ असल्यामुळे ट्रम्प यांनी या नावाने त्यांना संबोधले.
इराणशी होत असलेल्या संभाव्य कराराच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना तणाव आणखी वाढू द्यायचा नाही. त्यामुळेच त्यांनी इस्रायलला सावध राहण्याचा इशारा दिला. जर तणाव वाढत राहिला तर इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा मिळणार नाही, असे संकेतही ट्रम्प यांनी दिले. मात्र नेतान्याहू यांनी इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यावे लागेल, अशी ठाम भूमिका घेतली. जर इराणला उत्तर दिले गेले नाही तर इस्रायल कमकुवत झाल्याचे दिसेल आणि त्यातून चुकीचा संकेत जाईल.
विशेष म्हणजे ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील संभाषण इस्रायलच्या माघारीच्या आश्वासनाशिवायच संपले. यानंतर इस्रायली लष्कराने अमेरिकेला सांगितले की, ते आणखी हल्ले करणार आहेत.
इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील पेट्रोकेमिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर काही प्रकल्पांना लक्ष्य केले. इराणनेही या हल्ल्यांचे तत्काळ उत्तर देत इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. यात तेल अवीव वरील हल्ल्याचाही समावेश होता. दरम्यान अमेरिकन लष्कराने इस्रायलच्या हल्ल्यात सहभाग घेतलेला नाही. मात्र इस्रायलच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्र अडविण्यात मदत केली.
इराणने हल्ले थांबविण्याचे आश्वासन दिले – ट्रम्प
इराणने आणखी हल्ले करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले, इराणने आमच्याशी संपर्क करून यापुढे हल्ले करणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच इस्रायललाही हल्ले थांबविण्याची सूचना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, पश्चिम आशियातील अनेक देशांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि इस्रायलला थांबविण्यासाठी दाबव टाका, अशी विनंती केली. ॲक्सिऑसने दिलेल्या बातमीनुसार, इस्रायलकडून सोमवारी अनेक संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना फोन करून हल्ले न करण्याची सूचना दिली.
बिन्यामिन नेतान्याहू यांना ‘बीबी’ टोपणनाव कसे मिळाले?
बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘बीबी माय स्टोरी’ या नावाने आत्मचरित्र प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकात नेतान्याहू यांनी त्यांचा लहानपणीचा काळ, कौटुंबिक परिस्थिती, राजकारणातील कारकिर्द आणि देशासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे.
इस्रायली संस्कृतीमध्ये लहान मुलांना टोपणनाव देण्याची प्रथा आहे. बिन्यामिन नेतान्याहू यांच्या कुटुंबातील लोक आणि लहानपणीचे मित्र त्यांना बीबी या नावाने हाक मारत असत. बिन्यामिन या मूळ नावावरूनच हे नाव तयार झाल्याचे सांगितले जाते. बिन्यामिन नेतान्याहू हे नाव मोठे आणि उच्चारायला अवघड वाटू शकते, त्यामुळे बीबी नावाला चांगली प्रसिद्धी मिळाली.
