Donald Trump Will Meet Modi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदी लवकरच अमेरिका दौऱ्यावर जाणार असून त्यावेळी ही भेट होणार असल्याचे ट्रम्प यांनी सूचित केले. पंतप्रधान मोदी हे ऑस्ट्रेलिया आणि जपानचे नेत्यांबरोबर या आठवड्याच्या शेवटी क्वाड लीडर्स समिटसाठी अमेरिकेत जाणार आहेत.
मंगळवारी, परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या २१ ते २३ सप्टेंबर या तीन दिवसांच्या युनायटेड स्टेट्स दौऱ्याची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मूळ गावी म्हणजेच विल्मिंग्टन, डेलावेअर येथे औपचारिकपणे चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या हत्येच्या प्रयत्नानंतर मंगळवारी त्यांच्या पहिल्या सार्वजनिक उपस्थितीत बोलताना ट्रम्प म्हणाले की, मोदी अमेरिकेत असताना पुढील आठवड्यात त्यांची भेट घेतील. “ते (मोदी) पुढच्या आठवड्यात मला भेटायला येणार आहेत. मोदी विलक्षण माणूस आहेत. यातील बरेच नेते विलक्षण आहेत”, असं ट्रम्प म्हणाले.
कसा असेल मोदींचा दौरा
विल्मिंग्टन, डेलावेअर येथे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या क्वाड लीडर्स समिटने मोदी आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. या शिखर परिषदेला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फ्युमिओ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मोदी न्यूयॉर्कला जातील आणि २२ सप्टेंबर रोजी लाँग आयलंडमध्ये एका मेगा समुदाय कार्यक्रमाला संबोधित करतील.
दुसऱ्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात ते भविष्यातील ऐतिहासिक शिखर परिषदेत जागतिक नेत्यांना संबोधित करतील. ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासोबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीपूर्वी मोदींचा दौरा आला आहे. अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ५ नोव्हेंबरला होणार आहेत.
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर मोदींनी व्यक्त केला होता संताप
ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. तसेच ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. या हल्ल्यावरून मोदी यांनी चिंता व्यक्त केली. यासह “राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला थारा नाही.” अशा शब्दांत मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता.
मोदी यांनी म्हटलं होतं की, “माझे मित्र व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. राजकारण व लोकशाहीत हिंसेला थारा नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेन. आम्ही या हल्ल्यात निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले अमेरिकन नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.”