वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
इराणवर पुन्हा लष्करी हल्ले करण्याचे आदेश मागे घेण्यात येत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री सांगितले. ‘इराणवर जोरदार हल्ले करू आणि खर्ग बेटासह इराणच्या तेल प्रकल्पांचा व्हेनेझुएलाप्रमाणे ताबा घेऊ,’ असा इशारा ट्रम्प यांनी दिल्यानंतर काही तासांतच हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले.
अमेरिका आणि इराणमध्ये परस्परांवरील हल्ले सलग दुसर्या दिवशी सुरू होते. अमेरिकेच्या हल्ल्यांची तीव्रता आधीच्या हल्ल्यांपेक्षा कमालीची अधिक होती. एकमेकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इशारा दिला होता. ‘अमेरिकेची इराणबरोबर आजही चर्चा सुरू आहे. पण, इराणमधील प्रमुख तेल केंद्र असलेले खर्ग बेट घेण्यास आमचे आता प्राधान्य राहील,’ असे ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर नमूद केले होते. मात्र इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर हल्ल्यांचा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
