Donald Trump Strait of Hormuz cargo tariff: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांकडून २० टक्के शुल्क आकारणी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ तासांत रद्द केला आहे. आखाती देश आता अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, इराणशी संबंधित जहाजे वगळता इतरांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यात आली असल्याचेही त्यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
२० टक्के शुल्क आकारणीचा प्रस्ताव मागे
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी होर्मुझची सामुद्रधुनीत पुन्हा नाकेबंदी लागू करण्याची घोषणा केली होती. शिवाय, होर्मुझची सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांकडून २० टक्के शुल्क आकारणी करण्याची तयारीही बोलून दाखवली होती. दरम्यान, आज त्यांनी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी होर्मुझवर नियंत्रणाची आणि २० टक्के शुल्क आकारणीची घोषणा केल्यानंतर इराणने त्यांची खिल्ली उडवली होती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी, “२० टक्के खूप जास्त आहे, आम्ही त्यांना योग्य वागणूक देऊ”, असे वक्तव्य केले आहे.
आखाती देशांच्या गुंतवणुकीची योजना
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या शुल्क आकारणीच्या योजनेत बदल केल्याचे जाहीर करताना याबाबत आखाती देशातील नेत्यांशी चर्चा झाल्याचे म्हटले आहे. नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच शुल्क आकारणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “मध्य पूर्वेतील नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर २० टक्के शुल्क आकारणी करण्याच्या जागी, आखाती देश अमेरिकेत गुंतवणूक करतील,” असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलमधील पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी मोठी गुंतवणूक अमेरिकेत येत असल्याचा दावा करत याचा दोघांनाही फायदा होईल असे म्हटले आहे.
मोठ्या गुंतवणुकीचा दावा
नवीन करारामुळे अमेरिकेत अधिक कारखाने, उत्पादन केंद्र आणि उपकरणं उभारली जातील, असेही ट्रम्प म्हणाले. इराणशी संघर्ष सुरु असताना होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे खुली ठेवण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने महत्वाची भूमिका बजावली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासाठी ट्रम्प यांनी लष्कराचे कौतुक केले. अमेरिकेने होर्मुझमध्ये इराणी जहाजांसाठी नाकेबंदी लागू केल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इराणकडे कधीच अण्वस्त्र असणार नाही, याचा उल्लेखही ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलमधील पोस्टमध्ये केला आहे.
