पीटीआय, बीजिंग

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात गुरुवारी इराण युद्ध, व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर दीर्घ चर्चा झाली. या वेळी तैवान मुद्द्याची चुकीच्या पद्धतीने हाताळणी केल्यास दोन्ही देशांत संघर्ष उद्भवू शकतो, असा इशारा जिनपिंग यांनी ट्रम्प यांना दिला. ऊर्जेची जागतिक गरज लक्षात घेता होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणे आवश्यक असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यामध्ये चर्चेची पहिली फेरी बीजिंगमध्ये पार पडली.

दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली. ट्रम्प यांनी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी यांना २४ सप्टेंबर रोजी व्हाइट हाऊसमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. चीन आणि अमेरिकेमध्ये सकारात्मक द्विस्तरावरील संबंध प्रस्थापित करण्यासाठी ‘नवे उद्दिष्ट’ आखण्यावर एकमत झाल्याचे जिनपिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘चीन-अमेरिकेमध्ये सकात्मक सामरिक स्थिरता राखणारे संबंध प्रस्थापित होण्याचे नवे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या बाबतीत अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी मी सहमत आहे. या नव्या उद्दिष्टानुसार पुढील तीन वर्षे द्विस्तरावरील संबंधांना दिशा देण्यात येईल. दोन्ही देशांतील लोक आणि आंतरराष्ट्रीय समुदाय त्याचे स्वागत करील, अशी अपेक्षा आहे.’

‘अमेरिका आणि चीनमध्ये तैवान हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या मुद्द्याची हाताळणी योग्य झाली, तर द्विस्तरावरील संबंध चांगले आणि स्थिर राहतील. तसे झाले नाही, तर दोन्ही देशांमधील संबंध बिघडून धोकादायक परिस्थितीवर येण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांना कदाचित संघर्षाचाही सामना करावा लागू शकतो,’ असे ते म्हणाले. तैवानचा मुद्दा अमेरिकेने काळजीपूर्वक हाताळावा, असे आवाहन जिनपिंग यांनी ट्रम्प यांना केले.

तैवान हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याची हाताळणी नीट झाली नाही, तर अमेरिका-चीन यांच्यातील संबंध पूर्ण बिघडू शकतात आणि धोकादायक वळणावर पोहोचू शकतात. – क्षी जिनपिंग, अध्यक्ष, चीन

तुम्ही महान नेते आहेत. काही लोकांना मी असे म्हटलेले आवडत नाही. तरीही मी असे म्हणतो. ही कदाचित आतापर्यंतची सर्वांत मोठी शिखर परिषद असेल. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका