Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये नवीन टॅरिफ धोरण, बेकायदेशीर स्थलांतरिताचा मुद्दा, अमेरिकेतील कर्मचारी कपात यासह आणखी अनेक मोठ्या निर्णयांचा समावेश आहे. खरं तर ट्रम्प यांच्या निर्णयांची जगभरात चर्चा पाहायला मिळते. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी विदेशी स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवरील आयात शुल्कात दुप्पट वाढ करत २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्याची घोषणा केली आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ४ जूनपासून होणार आहे, म्हणजे हे नवे दर ४ जूनपासून लागू होणार आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा सत्तेत आल्यापासून आतापर्यंत अमेरिकेतील स्टीलच्या किमती १६ टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं जात आहे. आता स्टील आयातीवरील शुल्क दुप्पट वाढवत २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यामागे अमेरिकेतील स्टील उत्पादन क्षेत्रांना संरक्षण देण्यासाठी हे आयातशुल्क वाढवण्याच्या मागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, पेनसिल्व्हेनिया येथील यूएस स्टीलच्या मोन व्हॅली वर्क्स-इर्विन प्लांटमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “या दरवाढीमुळे देशांतर्गत स्टील उत्पादकांना अधिक संरक्षण मिळेल आणि अमेरिकन उत्पादन व अमेरिकन स्टील उद्योग अधिक मजबूत होईल. आता आम्ही स्टीलच्या आयातीवर २५ टक्के आयातशुल्क वाढवणार आहोत. आम्ही अमेरिकेत स्टीलवरील २५ टक्क्यावरून ५० टक्क्यांपर्यंत करणार आहोत, ज्यामुळे अमेरिकेतील स्टील उद्योग आणखी सुरक्षित होईल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर टीका
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीका केली. ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेचे भविष्य ‘शांघाय’च्या निकृष्ट स्टीलवर अवलंबून राहण्याऐवजी पिट्सबर्गच्या ताकदीने आणि अभिमानाने बांधलं पाहिजे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, ही शुल्कवाढ लागू केल्यानंतर गृहनिर्माण, बांधकाम क्षेत्रांसह स्टीलवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या उद्योगांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सरकारी आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा स्टीलवर शुल्क लादल्यापासून स्टील उत्पादनांच्या किमती जवळजवळ १६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.