Donald Trump On Iran : अमेरिका-इराण युद्धावर कोणताही ठोस तोडगा अजूनही निघालेला नाही. ८ एप्रिल रोजी फक्त युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. पण सध्या होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीवरून अमेरिका-इराणमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या माध्यमातून दोन्ही देशांत शांतता करारासाठी हालचाली सुरू आहेत.
आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची घोषणा केली आहे. अमेरिकेचं शिष्टमंडळ उद्या (२० एप्रिल) संध्याकाळी चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादला रवाना होणार असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, ही माहिती देत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली. ‘इराणने जर आता करार केला नाही, तर आम्ही सर्वकाही उडवून देऊ, इराणधील प्रत्येक वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त करू, आता खूप झालं’, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
“इराणने शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत गोळीबार केला. हे आमच्या शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन आहे. यामध्ये अनेक गोळ्या एका फ्रेंच जहाजावर आणि यूकेच्या एका मालवाहू जहाजावर झाडण्यात आल्या. पण हे काही चांगलं नव्हतं, नाही का? आता माझे प्रतिनिधी उद्या (२० एप्रिल) संध्याकाळी चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादला जात आहेत”, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
“इराणने अलीकडेच सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली. हे खरंच विचित्र आहे. कारण आमच्या नाकेबंदीमुळे सामुद्रधुनी आधीच बंद झाली आहे. त्यामुळे ते खरंतर नकळतपणे आम्हाला मदत करत आहेत आणि या सामुद्रधुनीच्या बंदमुळे होणारं नुकसान त्यांचंच आहे. जे दररोज ५०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असावं. यात अमेरिकेचं कोणतंही नुकसान होत नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
‘…तर इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प अन् पूल उद्ध्वस्त करू’
“खरं तर अनेक जहाजं सध्या आयआरजीसीच्या (IRGC) सौजन्याने माल भरण्यासाठी अमेरिका, टेक्सास, लुइझियाना आणि अलास्काकडे जात आहेत. मात्र, आयआरजीसीला नेहमीच स्वतःला ‘कणखर’ म्हणून दाखवायचं असतं. आता आम्ही एक अतिशय न्याय्य आणि वाजवी प्रस्ताव देत आहोत आणि मला आशा आहे की ते (इराण) तो स्वीकारतील. कारण जर त्यांनी तो स्वीकारला नाही, तर अमेरिका इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प आणि प्रत्येक पूल उद्ध्वस्त करेल. आता पुरे झालं”, अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

“इराणचे प्रतिनिधी देखील लवकरच करारावर सहमत होतील आणि जर ते सहमत झाले नाही, तर जे आवश्यक आहे ते करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. जे इतर राष्ट्राध्यक्षांनी गेल्या ४७ वर्षांपासून इराणविरुद्ध करायला हवं होतं. आता इराणच्या संहारक यंत्रणेचा अंत करण्याची वेळ आली आहे”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
