अमेरिका आणि इराण यांच्यात मागील चार महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपवण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री करण्यास मंजुरी दिल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं असून अमेरिकेच्या नौदलाने केलेली नाकेबंदी हटवण्याचे अधिकृत आदेश जारी केल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या सगळ्याबाबत इराणने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पण इराणने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे शांतता कराराबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत डील पूर्ण झाली आहे. सर्वांचं अभिनंदन. मी या माध्यमातून घोषणा करतो की होर्मुझची सामुद्रधुनी देखील टोल फ्री सुरु होईल आणि अमेरिकन नौदलाला देखील नाकाबंदी हटवण्यास मंजुरी देतोय, असं ट्रम्प म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधनाचा पुरवठा ज्या देशांना होतो त्या जगभरातील जहाजांनी त्यांची इंजिन सुरु करावी आणि तेलाचा पुरवठा सुरु होऊद्यात असं ट्रम्प म्हणाले.

शाहबाज शरीफ यांची पोस्ट काय?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील एक्सवर पोस्ट करत अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला दुजोरा दिला आहे. शहबाझ शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्या शांतता करार झाला आहे. दोनही पक्षांनी सर्व मुद्यांवर, याशिवाय लेबनॉनमधील लष्करी कारवाई थांबवण्यावर सहबती दर्शवली. पश्चिम आशियातील संघर्षावर मार्ग काढण्याच्या अमेरिका आणि इराण यांच्यातील कटिबद्धतेसाठी सहकार्य करणाऱ्या इतर देशांचे आभार, असंही शहबाझ शरीफ म्हणाले.

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे १४ मुद्दे काय?

लेबनॉनसह सगळ्या ठिकाणी कायमस्वरुपी शस्त्रसंधी
अमेरिका इराणच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करणार नाही
३० दिवसांच्या आत होर्मुझ मधून अमेरिकेचं नौदल आणि नाकेबंदी हटवली जाणार
३० दिवसांच्या आत होर्मुझ इराणकडून पु्न्हा सुरु केलं जाईल
इराणच्या पुनर्निमाणासाठी अमेरिका आणि सहकारी देश ३०० अरब डॉलर्सच्या योजना आणणार
इराणच्या तेल आणि उर्जा उत्पादनांवर असलेले निर्बंध हटवण्यात येतील
इराणने पुन्हा एकदा हे वचन द्यावं की ते अण्वस्त्र तयार करणार नाहीत.
अमेरिकेकडून वचन देण्यातआलं आहे की इराणमधील सैन्य मागे घेतलं जाईल. इराणवर कुठलेही नवे निर्बंध लादण्यात येणार नाहीत.

‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’चे जागतिक महत्त्व काय आहे?

जगातील एकूण कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यापैकी जवळपास २० टक्के भाग याच मार्गावरून जातो. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने हा जलमार्ग पूर्णपणे बंद केला होता. एप्रिल २०२६ मध्ये पाकिस्तानमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांना नौदलाने घेरले होते. मार्ग मोकळा झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्याची दाट शक्यता आहे.

इराणचं मौन कायम

डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानने कराराची घोषणा केली असली, तरी इराणच्या बाजूने अद्याप अधिकृत आणि सविस्तर वक्तव्य समोर आलेले नाही. सुरुवातीला इराणने पाकिस्तानच्या काही दाव्यांवर आक्षेप घेतला होता, ज्यामुळे हा करार किती मजबूत आहे, याबाबत तज्ज्ञांमध्ये काहीसे प्रश्नचिन्ह आहे. या कराराचे संपूर्ण तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, हा मार्ग नेमका कोणत्या दिवसापासून जहाजांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि खुला होईल, याकडे आता संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

मागील १०८ दिवसांमध्ये काय घडलं?

२८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला. सर्वोच नेते अयातुल्लाला खामेनी यांचा मृत्यू

२ मार्च ला हिजुबल्लाहची युद्धात उडी

५ मार्चला अमेरिकेच्या आखातातील हवाई तळांवर इराणचे प्रतिहल्ले

८ एप्रिलच्या दिवशी म्हणजेच युद्धाच्या चाळीसाव्या दिवशी १४ दिवसांची शस्त्रसंधी जाहीर

१२ एप्रिलला पाकिस्तानात इराण आणि अमेरिकेची पहिली शांतता चर्चा कुठल्याही तोडग्याविना निष्फळ ठरली

२० एप्रिलच्या शांततेच्या चर्चेला इराण गैरहजर राहिल्याने दुसऱ्या चर्चेचा प्रयत्नही निष्फळ ठरला.

१८ मे रोजी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातला तणाव वाढला

६ जून रोजी शस्त्रसंधी तुटली, अमेरिकेने इराणचे ६ ड्रोन केले निकामी

८ जूनला इराणने अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडलं, १०० दिवसांनी युद्ध पुन्हा भडकलं.

९ जूनला अमेरिकेने इराणवर केले बॉम्ब हल्ले

१३ जूनला दोन्ही देशांमधला करार अंतिम टप्प्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

१५ जून शांतता करार करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती