कोर्टच म्हणालं, ‘देशावर उपकार कर आणि इंजिनिअर होऊ नको’

तुम्ही दुसरा व्यवसाय निवडा. वाटल्यास कायद्याचे शिक्षण घ्या, पण इंजिनिअरिंग सोडा.

प्रतिनिधिक छायाचित्र

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) कुरुक्षेत्रमधील बीटेकच्या २००९ च्या बॅचच्या एका विद्यार्थ्याला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने फटकारले आहे. या विद्यार्थ्याने दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली आपली अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दया याचिका दाखल केली होती. ९ वर्षांपूवी तुम्ही सुरु केलेला इंजिनिअरिंगचा अभ्यास बंद करा आणि इतर व्यवसाय निवडा, असा सल्ला न्यायालयाने त्या विद्यार्थ्याला दिला आहे. तसेच तुम्ही आमच्यावर दया करा आणि न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका, असे म्हणत तुम्ही देशावरही दया करा आणि इंजिनिअर होऊ नका, अशा शब्दांत या विद्यार्थ्याला फटकारले.

२००९ मध्ये एनआयटी कुरुक्षेत्र येथे या विद्यार्थ्याने बीटेकसाठी प्रवेश घेतला होता. चार वर्षांत पदवी पूर्ण करताना त्याच्या १७ अंतर्गत परीक्षा राहिल्या होत्या. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियमानुसार त्याला चार वर्षांची मुदत देण्यात आली. या अतिरिक्त चार वर्षांतही त्याला या परीक्षा उत्तीर्ण होता आले नव्हते. वैयक्तिक कारणांमुळे आपल्याला अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होता आला नसल्याचे त्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.

आपल्याला अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणखी एक संधी द्यावी. जर ही संधी मिळाली तर आपण सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ, असे या विद्यार्थ्याने आपल्या अपिलात म्हटले होते. या विद्यार्थ्याने न्यायालयात दया दाखवण्याचे अपील केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला फटकारले आणि आमच्याकडे दयेचे अपील करु नका. तुम्हीच आमच्यावर दया दाखवा आणि न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. त्याबरोबरच तुम्ही देशावरही दया दाखवा आणि इंजिनिअर बनू नका, असे म्हटले.

न्यायालयाने म्हटले की, जर तुम्ही ९ वर्षांत इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण करु शकत नाही. तर १७ अंतर्गत परीक्षा केवळ एका महिन्यात कसे उत्तीर्ण व्हाल. तुम्ही दुसरा व्यवसाय निवडा. वाटल्यास कायद्याचे शिक्षण घ्या, पण इंजिनिअरिंग सोडा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dont become an engineer punjab haryana hc tells student left with 17 compartments

ताज्या बातम्या