Iran US Israel War news: अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू करून जवळपास महिना लोटला तरी युद्धातून स्पष्ट तोडगा निघालेला नाही. अमेरिकेने युद्धबंदीची चर्चा सुरू केली असली तरी इराणने त्यांच्या अटी मान्य केलेल्या नाहीत. अशातच आता जमिनीवरील हल्ला केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) अमेरिका आणि इस्रायलच्या लष्कराला इशारा दिला आहे. तसेच या दोन्ही देशातील जनतेला थेट आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प किंवा नेतान्याहू कपटाला बळी पडून तुमची मुले नरकात पाठवू नका. इराणच्या भूमीवर आक्रमण करणारे सैनिक इराणी समुद्रात नष्ट होतील, अशा इशारा आयआरजीसीने दिला आहे.
आयआरजीसीने थेट अमेरिकेतील जनतेलाही आवाहन केले आहे. त्यांचे नेते अमेरिकेच्या जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही आयआरजीसीने म्हटले. डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यासारख्या युद्धखोर लोकांच्या प्रभावाखाली अमेरिकन जनता आली आहे. युद्धाचे वास्तव पाहायचे असेल तर अमेरिकेच्या आखाती देशातील गॅस स्टेशन, इराणच्या रस्त्यांवर आणि तेल अविवच्या आकाशात पाहा, असेही आयआरजीसीने सांगितले.
अमेरिकेची जमिनीवरून हल्ला करण्याची योजना
सीबीएसने दिलेल्या वृत्तानुसार, पेंटागॉनने मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे सैन्य थेट इराणमध्ये उतरवण्याची योजना आखली असल्याची चर्चा आहे. अमेरिकेकडून इराणच्या खर्ग बेटावर सुरुवातीला संभाव्य भू-कारवाईचा विचार केला जात आहे. मरीन एक्सपेडिशनरी यूनिटही तैनात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ज्यामुळे मध्यपूर्वेत हजारोंच्या संख्येने सैन्य पोहोचवता येईल.
आयआरजीसीने अमेरिकेच्या युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ला करून हा डाव उधळून लावण्याचा इशारा दिला होता. तसेच इस्रायलच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा करत इराणने आपली आक्रमकता दाखवून दिली. तसेच तेल अविव आणि हायफाला जमीनदोस्त करून असा इशाराही आयआरजीसीने दिला आहे.
आयआरजीसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ७०० क्षेपणास्त्रे आणि ३,६०० ड्रोन्सने अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित लक्ष्यावर मारा करण्यात आला आहे. तसेच इराणच्या हवाई सुरक्षा कवच प्रणालीने शत्रूचे २०० हून अधिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचाही दावा इराणने केला आहे.
