पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पश्चिम बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी कोलकाता येथे ‘नबन्ना चलो’निषेध मोर्चाचं आयोजन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. यावेळी बंगाल पोलिसांनी भाजपाच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. दरम्यान, भाजपा नेते सुवेंदू अधिकारी एका विधानामुळे सोशल मीडियात ट्रोल होत आहेत.

मंगळवारी निषेध मोर्चादरम्यान सुवेंदू अधिकारी यांना एक महिला पोलीस अधिकारी अटक करत होती. यावेळी अटकेचा प्रतिकार करताना सुवेंदू अधिकारी यांनी “माझ्या शरीराला हात लावू नको, तू एक स्त्री आहेस आणि मी एक पुरुष आहे” असं विधान केलं आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

टीएमसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओ शेअर करताना टीएमसीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “भाजपाच्या ५६ इंच छातीच्या मॉडेलचा भंडाफोड, भाजपाची नवी घोषणा: माझ्या शरीराला स्पर्श करू नका. मी पुरुष आहे.”

हेही वाचा- कोलकात्यात भाजपच्या मोर्चादरम्यान हिंसाचार ; कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट; प्रदेशाध्यक्ष मुजुमदारांसह अनेक नेते अटकेत

संबंधित प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सुवेंदू अधिकारी यांनी सांगितलं की, मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. केवळ पुरुष पोलीस अधिकारी बोलवण्यासाठी आपण ते विधान केलं. या प्रकारानंतर डीसीपी आकाश मघारिया यांनी सुवेंदू अधिकारी यांना पोलीस वाहनापर्यंत नेले. कोलकाता पोलिसांनी पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांना ‘नबन्ना चलो’ मोर्चादरम्यान ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व नेत्यांना लालबाजार येथील पोलीस मुख्यालयात नेण्यात आलं आहे.

सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात हजारो भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने कोलकातामध्ये दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत पोलिसांची वाहनं जाळण्यात आली आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्लाही केला आहे.