अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी नको

अफगाणिस्तानातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती ढासळत आहे व तेथील लोकांना तातडीने मानवतावादी पातळीवर मदत करण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

आठ देशांच्या संवाद परिषदेतील जाहीरनाम्यात आवाहन

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर जागतिक दहशतवादासाठी होता कामा नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसेच त्या देशात सर्वसमावेशक  सरकार स्थापन होणे गरजेचे आहे, असे भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक संवादाअंती प्रसारित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. भारत, रशिया, इराण व इतर पाच मध्य आशियायी देशांनी या उद्दिष्टांवर सामुदायिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तान सुरक्षा संवाद परिषदेत त्या देशातील सुरक्षा परिस्थितीवर सर्वांगीण चर्चा करण्यात आली. अफगाणिस्तानच्या प्रदेशात दहशतवाद्यांना आश्रय, प्रशिक्षण व अर्थपुरवठा होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. त्याला संबंधित देशांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

अफगाणिस्तानातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती ढासळत आहे व तेथील लोकांना तातडीने मानवतावादी पातळीवर मदत करण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले. अफगाणिस्तानला थेट मदत देण्याची गरज असून त्यात भेदभाव असता कामा नये असेही स्पष्ट करण्यात आले. अफगाणिस्तानातील परिस्थितीचे केवळ त्या देशातच नव्हे तर इतर शेजारी देशातही परिणाम होऊ शकतात, असे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, जाहीरनाम्यात पुढे म्हटले आहे की, अफगाणिस्तानात शांतता व स्थिरता नांदावी यासाठी तसेच त्या देशाचे सार्वभौमत्व व एकता अखंडित राहावी यासाठी सर्व देशांचा र्पांठबा आहे. त्या देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करू नये यावरही मतैक्य झाले आहे.

कुंडुझ, कंदहार, काबूल या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले असून तेथील सुरक्षा स्थिती वाईट असल्याने त्या देशातील लोकांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्या देशातील दहशतवादी कारवायांचा निषेध करण्यात येत असून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा अर्थपुरवठा रोखण्याबाबत वचनबद्धता व्यक्त करण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट करून मूलतत्त्ववादाला रोखण्याची गरजही या वेळी प्रतिपादन करण्यात आली आहे. त्या देशातील मूलतत्त्ववाद, दहशतवाद, फुटीरतावाद व अमली पदार्थांची तस्करी याला आळा घालण्यासाठी सामूहिक पातळीवर सहकार्य करण्यात येईल असेही या वेळी सांगण्यात आले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल यांची चर्चा

अफगाणिस्तानातील सध्याच्या घडामोडी पाहता त्याचा परिणाम शेजारी देशांवर व तेथील लोकांवर होणार आहे,असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटले आहे. बुधवारी अफगाणिस्तान प्रश्नावर आठ देशांची बैठक भारताने आयोजित केली होती. त्या वेळी अध्यक्षपदावरून बोलताना डोभाल यांनी सांगितले, की अफगाणिस्तानातील प्रश्नावर या भागातील देशांनी चर्चा, सहकार्य व समन्वय या मुद्द्यांवर एकत्र येण्याची गरज आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर मूलतत्त्ववाद वाढून अमली पदार्थांची तस्करी होण्याचा धोका वाढला आहे. डोभाल यांनी सांगितले,की अफगाणिस्तानशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असले तरी यात प्रादेशिक शेजारी देशांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे या बैठकीतील चर्चा ही फलदायी ठरेल अशी आशा आहे. ही सल्लामसलतीची वेळ असून आम्ही जी चर्चा केली ती फलदायी आहे. त्यातून अफगाणिस्तानातील लोकांनाही लाभ होणार आहे. सामूहिक व सर्वंकष सुरक्षा वाढणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dont use afghanistan land for terrorism akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या