Dowry Demand: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सासरच्यांनी एका महिलेवर माहेरहून नवीन दुचाकी आणण्यासाठी दबाव आणला. इतकेच नव्हे तर त्यांनी असा दबाव टाकला की, जर ती नवीन दुचाकी, दागिने किंवा रोख रक्कम देऊ शकत नसेल, तर तिने तिच्या आजारी पतीला किडनी दान करावी.

दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेने मुझफ्फरपूर महिला पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत सासरच्यांवर हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की तिचे लग्न २०२१ मध्ये झाले होते. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे सासरचे लोक व्यवस्थित वागायचे, पण नंतर त्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. याचबरोबर तिला माहेरहून दुचाकी आणि रोख रक्कम आणण्यासाठी भाग पाडले. जेव्हा मागण्या वाढल्या, तेव्हा तिने त्या पूर्ण करण्यास नकार दिला. त्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर तिच्या आजारी पतीला किडनी दान करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

या महिलेने तक्रारीत पुढे सांगितले की, तिच्या पतीला लग्नाच्या आधीपासूनच किडनीचा आजार होता. पण तिला लग्नाच्या दोन वर्षांनी पतीच्या किडनीचा आजार असल्याचे कळले. सुरुवातीला पीडितेने सासरच्या लोकांच्या मागण्या हलक्यात घेतल्या, परंतु नंतर त्यांनी पीडितेवर दबाव टाकण्यास सुरूवात केली.

पीडित महिलेने सांगितले की, जेव्हा तिने त्यांच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच घराबाहेरही काढण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. दरम्यान पीडितेने पतीपासून घटस्फोट घेण्याचा आग्रहही धरला आहे, परंतु पती घटस्फोट घेण्यासाठी नकार देत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर, जिल्हा महिला पोलीस ठाण्यात तिच्या पती आणि सासरच्या इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुझफ्फरपूरचे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात तपास सुरू करण्यात आला आहे.