तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याने तिथल्या महिलांच्या आणि मुलींच्या मुलभूत हक्कांसह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जगभरातून अफगाणी नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांविषयी चिंता व्यक्त केली जातीये. अफगाण मुली आणि स्त्रियांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जात असून इथल्या संघर्षाची सर्वाधिक किंमत येथील निष्पाप नागरिकांना मोजावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी नोबेल विजेत्या मलाला युसुफजईसह ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरीन यांनी देखील तालिबानच्या राज्यात महिलांचं अस्तित्व धोक्यात असल्याचं म्हटलं होतं. आता कवी डॉ. कुमार विश्वास यांनी एक फोटो ट्विट करत तालिबानवर निशाणा साधला आहे.

कुमार विश्वास यांनी एक फोटो ट्विट केलाय. त्या फोटोत बिबट्या आणि हरीण दिसत असून बिबट्या हरणाचे लाड करतोय. या फोटोला “तालिबान महिलांची सुरक्षा करताना” असं कॅप्शन देत डॉ. विश्वास यांनी टोला लगावला आहे. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट केलं असून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलंय “हे एका गरीब समुहाचं सत्ताधाऱ्यांकडून केलं जाणारं शोषण आहे.” तर, “तालिबान महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेची हमी देतंय यापेक्षा मोठी चेष्टा काय असू शकते” असं एका युजरने म्हटलंय.

दरम्यान, तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतरच्या पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेत इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले.काबुलमधील प्रेसिडेंशियल पॅलेसच्या आतून पत्रकार परिषदेला संबोधित करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत केले जातील. याआधी तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले होते. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली होती.