देशभरात हिंदू बांधव आणि कृष्णभक्त कृष्णजन्माचा उत्सव साजरा करत आहे तर दुसरीकडे अल्लाह सोबत कृष्णाची भक्ती करणा-या डॉ. सय्यद अहमद यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे नवे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. उत्तर प्रदेशमधल्या कानपूरचे रहिवाशी असलेले सय्यद हे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जन्माष्टमीचा उत्सव आनंदात साजरा करत आहेत. अहमद कुटुंबाने गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून कृष्णभक्तीत खंड पडू दिला नाही. अहमद यांच्या घरात कृष्णाच्या विविध रुपांतील मुर्त्या आहेत. बालगोपाळ, मुरलीधर, झुलेलाल अशी कृष्णाची अनेक रुपे त्यांच्या घरात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण कृष्णाची भक्ती करतो आणि या परंपरेत आपण कधीच खंड पडू दिला नाही असेही त्यांनी सांगितले.
कृष्णजन्माचा सुंदर देखावा त्यांनी आपल्या घरात उभारला आहे. हंडीतून लोणी चोरून खाणारा कृष्ण, कालीया मर्दन, राधेसोबत प्रेमात आकंठ बुडालेला कृष्ण, कंसांपासून कृष्णाला सुखरूप यमुनेतून घेऊन निघालेले वासुदेव, मुरलीच्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करून टाकणारा कृष्ण अशी नाना रुप त्यांनी देखाव्यात ठेवली आहे. अहमद यांची कृष्णभक्ती इतकी आहे की जन्माष्टमीच्या पूजेत कोणतीही कमी ते पडू देत नाही. मी इतर कृष्णभक्तासारखाच असून कृष्णाची सेवा करण्याची प्रेरणा मला देवा शरिफपासून मिळाली हे ते आर्वजून सांगतात. आपल्या पत्नीची कृष्णावर खूप श्रद्धा आहे, दरवर्षी शेजारीदेखील आपल्याला पूजेसाठी मदत करतात असेही ते म्हणाले. मुस्लीम असूनही कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करून अहमद आणि त्यांच्या कुटुंबांनी हिंदु मुस्लिम ऐक्याचे आणखी एक उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.