दिनांक- ८ ऑक्टोबर, स्थळ – जिनिव्हा येथील सर्न प्रयोगशाळा, स्थानिक वेळ – १२ वाजून ४५ मिनिटे. सर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रयोग शाळेत काम करणारे वैज्ञानिक ‘कॉम्पॅक्ट मुऑन स्पेक्टोमीटर’ (सीएमएस)जवळील ‘ब४०’ कॅफेटेरियामध्ये जमले होते. इमारत क्रमांक ४० आणि ४२ मध्ये मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. इतक्यात स्टॉकहोल्म येथून भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्याचे थेट प्रक्षेपण सुरू झाले.
भौतिकशास्त्र विषयासाठीचे यंदाचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळणार यात तशी चर्चा करण्यासाठी फारशी संधी नव्हती. तरीही सर्न प्रयोगशाळेत त्यावेळी असलेल्या प्रत्येक वैज्ञानिकाला प्रचंड उत्सुकता होती. ‘सर्वात सूक्ष्म मूलकणाचा शोध घेण्यासाठीचा सिद्धांत यशस्वीपणे मांडून त्या सिद्धांताला सध्या सर्न येथील ‘अॅटलास’ आणि ‘सीएमएस’ या दोन्ही प्रयोगशाळेत मान्यता मिळाली असे वैज्ञानिक पीटर हिग्ज आणि फ्रान्सिस एग्लर्ट यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात येत आहे’, हे वाक्य कानी पडताच सर्नमध्ये जल्लोष सुरू झाला. प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन करून आनंद साजरा केला. हिग्ज आणि एग्लर्ट यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे सर्नमध्ये गेले काही वष्रे सुरू ‘ब्राऊट-एग्लर्ट-हिग्ज’ सिद्धांत प्रत्यक्षात सिद्ध करण्यासाठीच्या प्रयोगात अहोरात्र मेहनत घेणारे वैज्ञानिक, अभियंते या सर्वाचा सन्मान होता. यामुळेच समस्त वैज्ञानिक जगतातून ‘अॅटलास’ आणि ‘सीएमएस’मध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रयोगाची गरज ज्या सिद्धांतामुळे भासली तो सिद्धांत मांडलेल्या व्यक्तीला जगातील सर्वाच्च सन्मान मिळतो आणि त्याची घोषणा ऐकताना आपण ‘अॅटलास’ आणि ‘सीएमएस’ या दोन्ही प्रयोगशाळांच्याजवळ असणे असा अवीस्मरणीय क्षण त्यावेळेस सर्नमध्ये उपस्थित वैज्ञानिकांनी अनुभवला.
दुपारी दोन वाजता सर्नचे संचालक रोल्फ हेऊर यांनी वैज्ञानिकांशी संवाद साधला आणि मूलकण भौतिकशास्त्राला नोबेल मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सर्न येथील प्रयोगशाळांमध्ये मागील वर्षी आढळलेला हिग्ज बोसॉनचा शोध म्हणजे गेली अनेक वष्रे याबाबत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मेहनतीला मिळालेली पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुरस्कार जाहीर होताच सर्नची वेबसाइटच्या मुख्य पानावर ‘अभिनंदन’पर संदेश प्रसिद्ध करण्यात आला होता. नोबेल पारितोषिक हे मरणोत्तर देण्याचा प्रघात नसल्यामुळे या सिद्धांतामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे वैज्ञानिक रॉबर्ट ब्राऊट यांना हा सन्मान मिळू शकला नाही. पण यावेळी सर्वाना त्यांची आठवण मात्र झाली.