Iran Embassy Sholay Thakur Meme UN Criticism: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्यापासून इराणने सोशल मीडियावरून अमेरिका आणि इस्रायलला टोमणे मारलेले आहेत. जगभरातील इराणच्या दूतावास कार्यालयांनी त्यांच्या सर्जनशीलतेचा नमुना दाखवला आहे. आताही इराणने बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांचा दाखला देऊन थेट संयुक्त राष्ट्रांना डिवचले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांमध्ये संयुक्त राष्ट्रांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप इराणने केला आहे.

भारतातील इराणच्या दूतावासाने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. मार्व्हल सुपरहिरो डॉक्टर स्ट्रेंज आणि ठाकूर बलदेव सिंह यांचा फोटो शेअर करत इराणच्या दूतावासाने संयुक्त राष्ट्रांना फटकारले. सैद्धांतिकदृष्ट्या संयुक्त राष्ट्रांची भूमिका ही डॉक्टर स्ट्रेंजसारखी असायला हवी, पण ती प्रत्यक्षात ती शोले चित्रपटातील ठाकूर बलदेव सिंहसारखी आहे, असा टोला इराणच्या दूतावासाने लगावला आहे.

एक्सवर शेअर केलेल्या इमेजमध्ये पहिल्या चौकटीत डॉक्टर स्ट्रेंजचा फोटो आहे. ज्यात डॉक्टर स्ट्रेंजचे अनेक हात दिसत आहेत. शालेय पुस्तकांमधील संयुक्त राष्ट्रे, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. तर पुढे शोलेतील ठाकूरच्या भूमिकेतील संजीव कुमार यांचा फोटो दाखवला आहे. “संयुक्त राष्ट्रे प्रत्यक्षात”, असे कॅप्शन या फोटोला लिहिले आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी न्यूयॉर्क येथे नुकतीच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली होती, त्यानंतर हे मीम्स समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे अमेरिका आणि इस्रायलकडून वारंवार उल्लंघन होत असताना संयुक्त राष्ट्र त्याला प्रतिसाद देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप इराणने या बैठकीत केला.

यापूर्वी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचण्यासाठी अक्षय कुमारच्या मीमचा वापर केला होता. अक्षय कुमारच्या २००६ मधील ‘दीवाने हुए पागल’ या चित्रपटातील काही फोटो वापरून डोनाल्ड ट्रम्प यांना टोला लगावला होता. अक्षय कुमारचा खोटे खोटे रडतानाच्या चेहऱ्याचा फोटो वापरण्यात आला होता. “समुद्रात हरले, तेल १०० डॉलरपर्यंत पोहोचले. निवडणुकाही जवळ आल्या आहेत. ट्रम्प कसे आहात, काय सुरू आहे?”, असे कॅप्शन लिहून ट्रम्प यांना डिवचण्यात आले होते.