संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने हातमिळवणी केली असून, आता डीआरडीओने विकसीत केलेल्या आयुर्वेदिक सप्लीमेंट्स आणि अन्न पदार्थांची देशात व परदेशात विक्री तसेच जाहिरात रामदेव बाबा करणार आहेत. डीआरडीओने रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठासोबत अधिकृतरित्या भागीदारी जाहीर केली आहे. सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग, डीआरडीओ प्रमुख एस. क्रिस्तोफर आणि रामदेव बाबा यांच्या उपस्थित एक करार करण्यात आला. पतंजली योगपीठ आणि ‘डीआरडीओ’च्या डिफेंस इन्स्टिट्युट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च (DIHAR)मध्ये हा करार झाला. या करारानुसार ‘डीआरडीओ’च्या लेह येथील ‘डीआयएचएआर’ या प्रयोगशाळेत उत्पादनांची चाचणी होणार आहे. या प्रयोगशाळेत शेती व प्राण्यांवर आधारित उत्पादनांचे विकसन केले जाते. उत्पादनांच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळेचा वापर होईल आणि तयार होणाऱया उत्पादनांची विक्री व जाहिरातीसाठी पतंजली योगपीठ मदत करेल. तसेच ‘डीआयएचएआर’ आणि पतंजली यांच्यात तांत्रिक देवाण-घेवाण देखील होणार आहे. ‘डीआयएचएआर’ रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाला आपली पाच उत्पादने कशी तयार करायची याची तांत्रिक माहिती देणार आहे. पतंजली मार्फत अनेक आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्यात येतात. त्यास मोठी मागणी देखील आहे. या करारामुळे ‘डीआरडीओ’च्या उत्पादनांनासुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.