घटस्फोटाची प्रक्रिया दशकभरापेक्षा जास्त काळ लांबल्याने हताश झालेल्या एका ४४ वर्षीय व्यक्तीन कौटुंबिक न्यायालयातच पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. चेन्नईत मद्रास उच्च न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. पेशाने एमटीसी बस ड्रायव्हर असलेल्या सर्वाननने पत्नी वरालक्ष्मीवर कोर्टातच हल्ला केला.

त्यावेळी कोर्टरुममध्ये उपस्थित असलेल्या अन्य वकिलांनी त्याला रोखले व पोलिसांच्या ताब्यात दिले. कोर्टाने आरोपीला तुरुंगात पाठवले असून जखमी महिलेवर राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वानन आणि वरालक्ष्मीचा गेल्या दहा वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरु आहे. तंबाराम येथील न्यायालयातही वरालक्ष्मीने सर्वानन विरोधात हुंडयासाठी छळ केल्याचा खटला दाखल केला होता.

दुपारी बाराच्या सुमारास कोर्ट रुममध्ये दुसऱ्या एका खटल्याची सुनावणी सुरु असताना हल्ला झाला. वरालक्ष्मी कोर्टरुममध्ये ज्या ठिकाणी बसली होती सर्वानन तिथे चालत गेला. त्याने गॉगल बॉक्स उघडला व त्यातून धारदार शस्त्र काढले व वरालक्ष्मीवर वार केला. वरालक्ष्मी लगेच उठून बाजूला झाली व त्याचे पुढचे वार चुकवले. या झटापटीत वरालक्ष्मी जखमी झाली आहे. कोर्ट रुममध्ये उपस्थित असलेल्या एका वकिलाने ही माहिती दिली.