Driving License Validity 50 Years RTO rules proposal: देशभरातील लाखो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाहनचालक परवान्याचा वैधता कालावधी २० वर्षांवरून ५० वर्षांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. परवाना वारंवार नूतनीकरण करण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीकोनातून याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकार सध्या विविध प्रस्तावावर विचार करत असून, त्यात वाहनचालक परवान्याचा वैधता याचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

परवान्याची वैधता ५० वर्षांपर्यंत वाढविण्याची शक्यता

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबतची माहिती एनडीटीव्हीला दिली आहे. सरकार सध्या विविध प्रस्तावावर विचार करत असून, त्यात वाहनचालक परवान्याचा समावेश असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या वाहनचालक परवान्याचा वैधता कालावधी २० वर्षे असून, नूतनीकरण करण्यासाठी परवाना धारकाला आवश्यक कागदपत्र आणि काही वेळेस आरोग्य दाखला सादर करावा लागतो. नव्या प्रस्तावात सरकार परवान्याची वैधता ५० वर्षांपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे.

वाहन धारकांना मिळणार मोठा दिलासा

परवान्याचा वैधता कालावधी ५० वर्षांपर्यंत वाढवला तर वाहन धारकांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. सरकार देखील नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी याचा विचार करत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, राज्य सरकारांनी मात्र यामुळे महसूलात घट होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली आहे. पण, या विषयातील जाणकारांनी यामुळे महसूलात फारसा फरक पडणार नाही, असेही मत व्यक्त केले आहे. परवान्यासह सरकार वाहन हस्तांतरण, वाहन परवाना नूतनीकरण याचा देखील विचार करत असल्याची माहिती आहे.

ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्याची शक्यता

वाहन हस्तांतरण आणि वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सरकार विचार करत आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांचे काम कमी करण्यासह यासाठी नागरिकांना वाहतूक कार्यालयास भेट देण्याची गरज भासू नये असा सरकारचा विचार आहे. वाहनचालक परवाना नूतनीकरणासाठी लागणारे शुल्क ऑनलाईन पद्धतीने आकारले जाणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नकारात्मक गुण देण्याची आणि परवाना निलंबन किंवा रद्द करण्याशी जोडण्याची प्रणाली कार्यान्वित झाली की, नियम मोडणाऱ्या चालकांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.