अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये अनेक तालिबानी दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानामध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले असावेत असा अंदाज असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये तीन नागरिक ठार झाल्याचे एका दहशतवादी गटाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. वझिरीस्तानमध्ये दोन क्षेपणास्त्रे टाकण्यात आल्याचे अब्दुल्लाह वझीरस्तानी या तालिबानी नेत्याने रॉयटर्सला सांगितले आहे. या हल्ल्यात तीन नागरिक आणि सात दहशतवादी ठार झाल्याची माहिती त्याने रॉयटर्सला दिली. ही क्षेपणास्त्रे पडल्यानंतर त्या भागात मोठी आग लागल्याचे त्याने सांगितले.

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानातील दहशतवादी गटांच्या अड्डय़ांवर हल्ले करावेत असे एका माजी अधिकाऱ्याने सुचवले आहे. पाकिस्तानमध्ये तालिबानचे दहशतवादी राहात असून ती अफगाणिस्तानसाठी मोठी डोकेदुखी आहे असे या अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेने आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्ब पाकिस्तानच्या अफगाणिस्तान सीमेवर नानगड प्रांतात टाकला. त्यानंतर अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने पाकिस्तानात हल्ले करण्याची सूचना केली आहे. बुश प्रशासनात अफगाणिस्तान व संयुक्त राष्ट्रात राजदूत असलेले झाल्मय खलिझाद यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, तेथून मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू असतात.

अमेरिका व नाटो दलांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत व दहशतवाद्यांच्या अड्ड्यातून हे हल्ले करण्यात आले त्यामुळे अमेरिकेने तेथे हल्ले करणे गरजेचे आहे. हडसन इन्स्टिटय़ूट येथे आयोजित चर्चेच्या वेळी खलिझाद यांनी वरील मत व्यक्त केले. डोनाल्ड ट्रम्प यांना परराष्ट्र धोरणावरील पहिल्या भाषणासाठी खलिझाद यांनी निमंत्रित केले होते. माजी सहायक परराष्ट्र मंत्री रॉबिन राफेल यांनी सांगितले की, आताच्या परिस्थितीत अमेरिकेन अफगाणिस्तान पाकिस्तानातील कारवायांकडे दुर्लक्ष करू नये पण पाकिस्तानविरोधात सरसकट युद्ध पुकारणेही योग्य नाही. अफगाणिस्तानच्या प्रश्नावर वाटाघाटीतून राजकीय तोडगा काढावा.