जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ मंगळवारी रात्री १० वाजता एक ड्रोन घिरट्या घालताना दिसलं. याबाबतची माहिती मिळताच लष्कराने ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर ड्रोन पाकिस्तान सीमेत परतलं. भारतीय सीमेत ड्रोन हल्ल्याचा हा सहावा प्रयत्न होता. “अरनिया सेक्टरमध्ये १३ जुलैच्या रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी ड्रोन घिरट्या घालताना दिसलं. लष्कराला २०० मीटर उंचीवर लाल दिवा चमकताना दिसला. लष्कराने तात्काळ त्याच्या दिशेने गोळीबार केला”, अशी माहिती बीएसएफने दिली आहे.

२ जुलैला पाकिस्तानच्या क्वाडकॉप्टरने अरनिया सेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. लष्काराने गोळीबार केल्यानंतर ते मागे हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून देशातील महत्त्वपूर्ण भागांवर हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. २७ जूनला ड्रोन हल्ल्याचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. त्यात जम्मू शहरातील वायुसेनेच्या दोन ठिकाणांवर स्फोटकं टाकण्यात आली होती.

ड्रोनचा माग काढण्यासाठी तपास अधिकारी विमानतळाच्या संरक्षक भिंतींवर लावलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणासह अन्य ठिकाणचे चित्रणही तपासत आहेत. ड्रोन कोठून आले, याचा शोध घेतला जात आहे. श्रीनगर, उधमपूर, राजोरीसहित जम्मू काश्मीरमधील सीमाभागात ड्रोन आणि मानवरहित हवाईयंत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. अशी उपकरणं बाळगणं आणि विक्री करण्यास मनाई आहे. ड्रोनच्या मदतीने हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना जास्त खर्च येत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांनी आता ड्रोनच्या मदतीने हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लष्कराला आता अधिक सक्षमपणे ड्रोन हल्ले परतवून लावण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.