देशातील सर्वाधिक सुरक्षा असणाऱ्या सरकारी इमारतींपैकी एक असणाऱ्या नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न एका जोडप्याने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दारुच्या नशेत असणाऱ्या या जोडप्याने राष्ट्रपती भवनामध्ये सोमवारी रात्री घुसखोरीचा प्रयत्न केला. राष्ट्रपती भवानामधील प्रेसिडंट इस्टेटच्या गेटला गाडीने धडक देत या जोडप्याने राष्ट्रपती भवानाच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

एक गाडी गेटला धडक देऊन राष्ट्रपती भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून तिथे तैनात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने या जोडप्यावर कारवाई करत ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघेही वयाच्या विशीतील आहेत. दोघांनी हुंडाई आय-२० गाडीच्या मदतीने राष्ट्रपती भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही गाडीही ताब्यात घेतली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरक्षेला धोका पोहचवणे, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणे आणि मोटर अधिनियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी या जोडप्याविरोधात एफआयआर दाखल केलाय. साऊथ एव्हेन्यू पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. एसीपी स्तरावरील अधिकाऱ्याने हा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेसंदर्भात सोमवारी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी पोलीस स्थानकामध्ये माहिती मिळाल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. या जोडप्याने गाडीने काही बॅरीकेट्सला धडक दिली आणि गेटमधून ते राष्ट्रपती भवनाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, असंही अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.