Economist Jeffrey Sachs analysis on Dubai Abu Dhabi war threat and UAE foreign policy risks : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची झळ मध्यपूर्वेतील देशांसह जगभरात बसताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान अमेरिकेचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. इराणबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलची बाजू घेऊन संयुक्त अरब अमिराती (UAE) मोठी चूक करत असल्याचे सॅक्स म्हणाले आहेत. जर यूएईने या संघर्षात उतरण्याचा निर्णय घेतला, तर दुबई आणि अबू धाबी यांसारखी त्यांच्या प्रमुख शहरांवर बॉम्बफेक होण्याचा धोका असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

अमेरिकन अर्थतज्ज्ञ सॅक्स म्हणाले की, दुबई आणि अबू धाबी हे काही ‘मिलीटरी झोन’ नाहीत तर प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, जेथे श्रीमंत लोक हे विश्रांती आणि मौजमजेसाठी येतात. युद्धात प्रवेश केल्याने त्यांच्या शहरांना लक्ष्य केले जाऊ शकते, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, यूएईने अमेरिकेसह आपल्या इतर मित्र राष्ट्रांना कळवले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या ‘मल्टिनॅशनल मॅरिटाइम टास्क फोर्स’मध्ये सहभागी होण्याची त्यांची तयारी आहे. होर्मुझची सामुद्रधुनी या आखाती देशांतील महत्त्वाच्या जलमार्गातून जहाजांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी एक आघाडी उभी करण्यासाठी यूएईकडून प्रयत्न केले जात आहेत.

“मुळात, जर यूएई या युद्धात उतरले तर दुबई आणि अबू धाबी उडवून दिले जाऊ शकतात. ही रिसॉर्ट्सची ठिकाणे आहेत. ही पर्यटन स्थळे आहेत. ही काही तटबंदी असलेली मिसाईल डिफेन्स क्षेत्र नाहीत. ही अशी ठिकाणे आहेत जिथे श्रीमंत लोक पार्ट्या करण्यासाठी आणि पैसा गुंतवण्यासाठी जातात. अशा परिस्थितीत युद्धात उडी घेणे म्हणजे दुबईसारख्या ठिकाणांच्या मूळ उद्देशाच्या विरोधात जाण्यासारखे आहे. अमिरातीने डोळे उघडे ठेवून स्वत:ला एका विचित्र अडचणीत पाडून घेतले आहे आणि ते यात अजून भर घालत आहेत,” असे सॅक्स एएनआयशी बोलताना म्हणाले.

अमेरिकेचे भागीदार होण्यासाठी Abraham Accords वर स्वाक्षरी करणे ही यूएईसह इतर आखाती देशांची मोठी चूक आहे असेही सॅक्स पुढे बोलताना म्हणाले. परकीय धोक्यांपासून संरक्षणासाठी अमेरिकेवर अवलंबून राहण्यापेक्षा, स्वत:च्या संरक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला सॅक्स यांनी यावेळी यूएईला दिला आहे.

“माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, पण, आम्ही दुष्ट इराणी लोकांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेमध्ये सामील होणार आहोत आणि अमेरिकेत ट्रिलियन्स डॉलर्सची गुंतवणूक करण्याची आमची वचनबद्धता पाळत राहू, ही कालची घोषणा अत्यंत भोळेपणाची आहे. पुरे करा. आता स्वतःचे संरक्षण करा. परिस्थिती समजून घ्या. तुम्हाला खरेच वाटते का, की या क्षणाला एक तोट्याचा निर्णय असूनही त्यावरच भर देणे हा पुढे जाण्याचा योग्य मार्ग आहे? पण ते सध्या नेमके तेच करत आहेत,” असे सॅक्स यांनी म्हटले आहे.