Dubai Airport Drone Attack updates: इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाच्या झळा मध्यपूर्वेतील देशांना देखील बसताना पाहायला मिळत आहेत. आज (बुधवारी) दोन ड्रोन दुबई आंतरराष्ट्रीय विमातळाजवळ पडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून यामध्ये एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. अमेरिका-इस्रायल या देशांनी २८ फेब्रुवारी रोजी इराणवर संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर इराणकडून प्रत्युत्तरादाखल इस्रायल आणि मध्यपुर्वेतील देशांवर हल्ले केले जात आहे. सध्यातरी हा संघर्ष संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. मात्र या संघर्षाचा या प्रदेशातील पायाभूत सुविधांवर परिणाम होताना दिसत आहे.
युएईमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की ड्रोन पडल्यानंतरही विमानतळावरून विमान वाहतूक सुरळीतपणे सुरू होती असे सांगितले.
“अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की काही वेळापूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (DXB) परिसरात दोन ड्रोन कोसळले,” अशी माहिती दुबई मीडिया ऑफिसने एक्सवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या घटनेत दोन घानाचे नागरिक आणि एक बागलादेशी नागरिकाला किरकोळ दुखापत झाली आहे, तर एका भारतीय नागरिकाला मॉडरेट जखमा झाल्या आहेत, असेही मीडिया ऑफिसने म्हटले आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा Emirates एअरलाइन्सचे मुख्य केंद्र आहे. हे जगातील सर्वात गजबजलेल्या विमानतळांपैकी एक आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृ्त्तानुसार, गेल्या वर्षी या विमानतळाने जवळपास १०० दशलक्ष प्रवासी हाताळले होते.
अमेरिका-इस्रायलने हल्ला केल्यानंतर पेटलेल्या संघर्षादरम्यान दुबई विमानतळ परिसरात ड्रोन कोसळल्याची घटना घडली आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक विमान सेवांवर झाला आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या भीतीमुळे मध्य पूर्वेतील अनेक हवाई क्षेत्रांवर निर्बंध आले आहेत. ज्यामुळे विमान कंपन्यांना उड्डाणे रद्द करणे, मार्ग बदलावा लागल्याचे पाहायला मिळाले.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, युएईमधील विमान कंपन्या जसे की Emirates आणि Etihad एअरवेज यांना २८ फेब्रुवारीला संघर्ष सुरू झाल्यापासून आता आपल्या काही सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत. असे असले तरू या सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत.
तर दुसरीकडे सागरी सुरक्षा अधिकाऱ्यांनी या प्रदेशात जहाजावर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्सने सांगितले की, युएईच्या किनाऱ्याजवळ एका कंटेनर जहाजावर आणि एका बल्क कॅरिअरवर काही प्रोजेक्टाइल येऊन आदळले. तर दुसरीखडे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ओमानच्या जवळ एका जहाजावर हल्ला झाला, ज्यानंतर जहाजावर आग लागीली जी नंतर आटोक्यात आणण्यात आली.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आखाती देशांमध्ये ऊर्जेसंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. यामध्ये रास तनुरा येथील सौदी अरामको कॉम्प्लेक्स आणि युएईमधील Ruwais रिफायनरी यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच कतार एनर्जी या बड्या गॅस उत्पादकाने गेल्या आठवड्यात संघर्षाचे कारण देत उत्पादन थांबवले आहे.
