Burj Al Arab Closed: Dubai’s most famous landmark Burj Al Arab luxury hotel is set for a massive 18-month renovation : दुबईमधील अल अरब हे लक्झरी हॉटेल रिनोव्हेशनसाठी १८ महिने बंद केले जाणार आहे, अशी माहिती हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने बुधवारी दिली आहे. १९९९ मध्ये सुरू झाल्यापासून हॉटेलचे पहिल्यांदाच रिनोव्हेशन केले जाणार आहे, अमेरिका-इस्रायलचे इराणबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे या प्रदेशातील पर्यटकांची संख्या सध्या मंदावलेली असताना हे काम केले जाणार आहे.
हॉटेलची मालकी ज्यांच्याकडे आहे त्या जुमेराह समूहाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, रिनोव्हेशनचे काम हे सुमारे १८ महिन्यांच्या काळात टप्प्याटप्प्याने पार पाडले जाईल आणि पॅरिसमधील इंटेरिअर आर्किटेक्ट ट्रिस्टन ऑउर यांच्या नेतृत्वाखाली हे काम केले जाईल. मात्र, नूतनीकरणाच्या काळात हॉटेल पूर्णपणे बंद राहील, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले नव्हते.
कर्मचाऱ्याने सांगितले की,नूतनीकरणाचे हे काम केले जात असताना हॉटेलमध्ये बुकिंग असलेल्या ग्राहकांना जवळच्या इतर होटेलमध्ये पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. हॉटेल बंद राहाण्याचा कालावधी बदलू शकतो असेही त्यांनी सांगितले.
एखाद्या जहाजाच्या शिडासारखा आकार असलेली हॉटेलची इमारत ही दुबईमधील एक सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक आहे. इतकेच नाही तर जुमेराह ग्रुपची फ्लॅगशीप प्रॉपर्टी आहे. मार्चच्या सुरुवातीला इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यादरम्यान पाडण्यात आलेल्या ड्रोन्समुळे हॉटेलचे काही प्रमाणात नुकसान झाले होते.
मार्चमध्ये झालेल्या या घटनेचा दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या नूतनीकरणाच्या कामाशी काहीही संबंध नाही असे कर्मचाऱ्याने सांगितले. युनायटेड अरब अमिरातीमधील जुमेराहने देखील आपल्या निवेदनात या प्रोजेक्टचा युद्धाशी कोणताही संबंध जोडलेला नाही.
मात्र या नूतनीकरणाची टायमिंग लक्षात घेण्यासारखी आहे, कारण अमेरिका-इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे दुबईच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. विमान उड्डाणांमध्ये अडथळे आल्याने पर्यटकांची संख्या घटली असून युएई आणि लक्झरी हॉटेल समूहांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत.
