Dubai International Airport: सोमवारी (ता. १६) सकाळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टाकीवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर मोठी आग लागली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात उड्डाण सेवा थांबवल्या. दुबई अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यासाठी नागरी संरक्षण पथके तात्काळ तैनात करण्यात आली असून आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
इंधन टाकीचे नुकसान
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये दूरवरून मोठ्या ज्वाला दिसत आहेत, ज्यामुळे आगीचे प्रमाण स्पष्ट होते. मात्र, ‘लोकसत्ता’ला या व्हिडिओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही. “दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात ड्रोनच्या घटनेमुळे एका इंधन टाकीचे नुकसान झाले आहे. दुबई नागरी संरक्षण पथके सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी काम करत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही,” असे दुबई मीडिया ऑफिसने म्हटले आहे.
धमकीनंतर हल्ला
इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील तीन प्रमुख बंदरे रिकामी करण्याचे आवाहन केल्यानंतर अवघ्या एका दिवसात हा हल्ला झाला. तेहरानने प्रथमच शेजारच्या देशातील गैर-अमेरिकन मालमत्तेलाही धमकी दिली आहे. इराणने असा आरोप केला आहे की, अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य टर्मिनल असलेल्या खर्ग बेटावर हल्ले करण्यासाठी यूएईमधील बंदरे, गोदी आणि इतर ठिकाणांचा वापर केला.
पायाभूत सविधांवर हल्ले
२८ फेब्रुवारीपासून इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर तेहरानने मध्य पूर्वेतील अमेरिकन तळ आणि हितसंबंधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचीही नोंद झाली असून, त्यांच्या धोरणात्मक आणि प्रशासकीय पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तेव्हापासून आखाती अरब राष्ट्रांमधील अमेरिकेचे लष्करी तळ, तेल सुविधा, बंदरे, विमानतळ, हॉटेल तसेच निवासी आणि व्यावसायिक इमारती यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर २,००० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले झाले आहेत.
हल्ल्यानंतर धुराचे लोट
जगातील सर्वाधिक व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आणि प्रमुख ट्रान्झिट हब असलेल्या दुबई विमानतळावर यापूर्वीही अनेक वेळा ड्रोन हल्ले झाले आहेत. सर्वात अलीकडील हल्ला ७ मार्च रोजी नोंदवण्यात आला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये परिसरात धुराचे मोठे लोट दिसत होते, तर विमानतळाच्या आत विमानांची प्रतीक्षा करणारे प्रवासी अलर्ट वाजल्यानंतर एअरफिल्डवरील ट्रेन बोगद्यांकडे धावताना दिसत होते.
दरम्यान, १ मार्च रोजी रात्री झालेल्या इराणी हल्ल्यात विमानतळासह ऐतिहासिक बुर्ज अल अरब हॉटेललाही नुकसान झाले होते. त्या घटनेत विमानतळावर चार जण जखमी झाल्याचे अमिरातीच्या मीडिया ऑफिसने रविवारी पहाटे सांगितले होते.
