दुबई येथे शनिवारी रात्री इराणने हल्ला केला. यावेळी इराणच्या क्षेपणास्त्राचे अवशेष २३ मरिना टॉवरच्या एका इमारतीवर कोसळले. ज्या इमारतीवर हल्ला झाला तेथून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. तसंच, या इमारतीच्या एका भागाला किरकोळ नुकसान झालं आहे. तसंच, दर्शनी भागातून धूरही निघत होता.
दुबई सरकारने या घटनेची माहिती दिली असून हवाई संरक्षण प्रणालींनी येणाऱ्या प्रक्षेपणास्त्राला यशस्वीरित्या रोखले आहे, परंतु कोसळलेल्या ढिगाऱ्यामुळे मरीनामधील एका इमारतीच्या बाहेरील भागाला किरकोळ नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
“दुबई मरीना येथील टॉवरच्या दर्शनी भागावर यशस्वीरित्या अडवण्यात आलेल्या ढिगाऱ्यामुळे एक किरकोळ घटना घडल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोणतीही दुखापत झाली नाही,” असे दुबई सरकारच्या अधिकृत मीडिया हँडलने X वर लिहिले. “ऐकलेले आवाज हे हवाई संरक्षण प्रणालीने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखल्याचा परिणाम आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी एकूण १६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आढळून आली, त्यापैकी १५ पाडण्यात आली तर एक समुद्रात कोसळले. ट्रॅक केलेल्या १२१ ड्रोनपैकी ११९ ड्रोन नष्ट करण्यात आले. युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी यापूर्वी अबू धाबी टीव्हीवर सार्वजनिक भाषण दिले, संघर्ष वाढल्यानंतर प्रथमच ते थेट त्यांच्या राष्ट्राशी बोलत होते.
इस्रायलचा इराणवर जोरदार हल्ला
इस्रायलने इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून शनिवारी इराणच्या अनेक इंधन केंद्रावर हल्ले केले. परिणाीम तेहरान आणि शेजारील कारज शहर स्फोटांमुळे हादरले होते. यामुळे आकाशात आगीचे आणि धुराचे मोठे लोळ उठले होते. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये हल्ल्याच्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात ज्वाळांचे लोळ उठताना दिसत आहेत. गेल्या आठवड्याभरात अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले. या हल्ल्यांमधअये तेहरान आणि अल्बोर्झ प्रांतातील अनेक तेल साठवणूक डेपोंना लक्ष्य करण्यात आलं होतं.
