Dubai Marina Explosions UAE : मध्य पूर्वेतील देशांमध्ये गेल्या १६ दिवसांपासून युद्ध सुरू असून रविवारी पहाटे दुबईतील अनेक प्रमुख जिल्ह्यांत मोठे आवाज झाल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं. हे आवाज प्रामुख्याने दुबई मरिना आणि अल सुफूह भागात ऐकू आले. दुबई मीडिया ऑफिसने याबाबत अधिकृत माहिती दिली असून त्यांनी म्हटलंय की, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीने केलेल्या यशस्वी प्रतिवादामुळे (interceptions) हे आवाज झाले होते.
गेल्या दोन दिवसांतही अशाच प्रकारच्या घटनांची नोंद झाली होती. शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागात स्फोट किंवा प्रतिवादाशी संबंधित आवाज ऐकू आले, तर शुक्रवारी दुबईच्या गजबजलेल्या ‘डाउनटाउन’ भागातील रहिवाशांनी अशाच आवाजांची माहिती दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी दुबईच्या आर्थिक क्षेत्रावर (Financial District) संशयित इराणी ड्रोनने हल्ला केला, ज्यामुळे मोठे स्फोट झाले आणि आकाशात धुराचे लोट उसळले. हा हल्ला अमिरातीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या ‘दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर’ला लक्ष्य करून करण्यात आला होता. एएफपी (AFP) प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, शहरात दोन मोठे स्फोट झाले, ज्यांच्या तीव्रतेमुळे आसपासच्या इमारती हादरल्या. त्यानंतर काही वेळातच मध्यवर्ती भागातून काळ्या धुराचे लोट उठताना दिसले.
दरम्यान, रविवारी झालेल्या इराणी हल्ल्यांनंतर युएईच्या फुजैराह तेल टर्मिनलवरील कामकाज ठप्प झाले. फुजैराहमध्ये धुराचे लोट हवेत पसरले होते आणि अधिकारी अनेक तास आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. या हल्ल्यात एक जॉर्डनचा नागरिक जखमी झाला असून, बंदरातील तेल भरण्याचे काही काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. ओमानच्या आखातात असलेले फुजैराह बंदर ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’च्या बाहेर असल्याने युएई आणि जागतिक तेल बाजारासाठी ते अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या बंदरामुळे तेल निर्यात करताना जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्गांपैकी एक असलेल्या अरुंद सामुद्रधुनीला वळसा घालणे शक्य होते.
दुबईवर इराणी हल्ल्यांचे संकट
जागतिक आर्थिक आणि विमान वाहतुकीचे प्रमुख केंद्र असलेले दुबई शहर इराणसोबतच्या युद्धात थेट हल्ल्यांचा सामना करत आहे. अमिरातीच्या अधिकाऱ्यांनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युएईच्या दिशेने १,७०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले आहेत, ज्यापैकी बहुतांश हवाई संरक्षण यंत्रणेने यशस्वीरीत्या रोखले आहेत. असे असूनही, काही हल्ले किंवा पडलेल्या ढिगाऱ्यांमुळे दाट लोकवस्ती असलेल्या या शहरातील घरे, कार्यालये आणि रस्त्यांचे नुकसान झाले असून यात चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यात इराणचे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्यापासून पश्चिम आशियात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
