सुप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा उंच इमारतीची निर्मिती करण्याची तयारी दुबईमध्ये सुरू आहे. बुर्ज खलिफा इमारत जगातील सध्याची सर्वात उंच इमारत आहे. मात्र, दुबई क्रिक हार्बर परिसरातील एका नवीन टॉवरचा सहा वर्ग किलोमीटरचा मास्टर डेव्हलपमेंट प्लॅन हा ८२८ मीटर उंच असलेल्या बुर्ज खलिफा इमारतीपेक्षा काहीसा उंच असल्याची माहिती विकासक एम्मारने दिली आहे. पण या इमारतीच्या उंचीबाबची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. इमारतीच्या उंचीबाबत इतक्यात काही सांगणार नसल्याचे एम्मार प्रॉपर्टीजचे संचालक मोहम्मद अलाबर म्हणाले. इमारतीच्या उद्घाटनावेळी तिच्या उंचीबाबतची माहिती जाहीर करण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले. या इमारतीच्या उभारणीसाठी करोडो डॉलर्सचा खर्च येणार असून, १८ मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ब्युटीक हॉटेल असेल. या इमारतीवरून संपूर्ण शहराचे दर्शन करता येईल, त्याशिवाय एक हँगिंग गार्डन असेल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.