Dubai Tel Aviv plane hijack : दुबईमधून तेल अवीवला जाणाऱ्या एका विमानात धक्कादायक घटना घडली आहे. फ्लाय दुबई कंपनीचं एक विमान दुबईवरून तेल अवीवला जात होतं. मात्र, यावेळी अचानक इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये विमान वळवण्यात आलं आणि इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र, अचानक इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आल्याने विमान हायजॅक झाल्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे हे विमान सौदी अरेबियामध्ये उतरवण्यात आलं.
नेमकी काय घडलं?
विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईमधून तेल अवीवला जाणाऱ्या या विमानातील दोन्ही वैमानिकांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली आहे. Ynet या इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानात २७ मुलांसह एकूण १७४ प्रवासी होते. दोन्ही वैमानिकांमध्ये झालेल्या हाणामारीत इमर्जन्सीचा सिग्नल पाठवण्यात आला. त्यानंतर हे विमान सौदी अरेबियात सुखरूप उतरवण्यात आलं. मात्र, ही विमान हायजॅकची घटना नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
विमानातील प्रवाशांनी सांगितला थरार
“दुबईहून तेल अवीवला आम्ही जात होतो. मात्र, अचानक विमानात आम्ही आरडाओरडा ऐकला. मग कॉकपिट उघडलं आणि आम्हाला धक्का बसला. तिथे रक्त दिसलं, कोणीतरी पायलटवर खिशातील चाकूने हल्ला केला होता”, असं एका प्रवाशाने सांगितलं. या घटनेनंतरचं वर्णन करताना आणखी एका प्रवाशाने टाइम्स ऑफ इस्रायलला सांगितलं की, “विमानाच्या केबिनमध्ये आरडाओरडा सुरू होता. हे ऐकल्यानंतर विमानात काहीतरी चुकीचं घडत असल्याचं लक्षात आलं. विमानात आरडाओरडा सुरू झाल्यानंतर काही वेळाने समजलं की एका पायलटवर चाकू हल्ला झाला आणि तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे विमानावरील नियंत्रण सुटलं होतं आणि ते वेगाने खाली आलं होतं. त्यामुळे काही क्षण असं वाटलं की कदाचित आता आपण वाचणार नाही”, असा थरारक अनुभव एका प्रवाशाने सांगितला. या संदर्भातील वृत्त Ynet या इस्रायली वृत्तसंस्थने दिलं आहे.
हायजॅकची घटना नसल्याचं स्पष्टीकरण
विमान हायजॅक झाल्याची भीती निर्माण झाली आणि विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियामध्ये उतरवण्यात आलं. या घटनेमुळे इस्रायलने तात्काळ आपली लढाऊ विमाने आकाशात तैनात केली. तसेच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सुरक्षेशी संबंधित तातडीची बैठक घेतली. मात्र, ही घटना हायजॅकची नव्हती, असं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने नंतर स्पष्ट केलं, असं ‘रॉयटर्स’ ने दिलेल्या एका वृत्तात म्हटलं आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
एका इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितलं की, विमान हायजॅक झाल्याची कोणतीही निश्चित माहिती नव्हती. मात्र, पायलटशी संपर्क होत नसल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, हा प्रकार हायजॅकचा नसून दोन्ही पायलटमधील भांडणामुळे घडला होता, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
इमर्जन्सी कोड
विमानातून विमानाने सुरुवातीला ‘७७००’ हा आंतरराष्ट्रीय इमर्जन्सीचा कोड पाठवला. त्यानंतर लगेच विमान हायजॅक झाल्याचा किंवा हस्तक्षेपाचा इशारा देणारा ‘७५००’ हा कोड पाठवला गेला. हा संदेश आल्यानंतर इस्रायलकडे जाणारे हे विमान सौदी अरेबियाच्या दिशेने मागे फिरले. विमानाची उंची कमी करण्यात आली आणि शेवटी ते सौदी अरेबियात उतरले. सुरुवातीला इस्रायली अधिकाऱ्यांनी ही घटना हायजॅकची असू शकते असे गृहीत धरुन लढाऊ विमाने पाठवली आणि विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
