Watch US Consulate Dubai Drone Attack video : दुबईतील अल सीफ रोडवरील अमेरिकन दूतावासाजवळ इराणने हल्ला केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. परिणामी इराणनेही अमेरिकेवर हल्ला करण्यास सुरुवात केली. दरम्यान, इराणने दुबईतील अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन हल्ला केला.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी सांगितले की, दुबईतील अमेरिकन दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कर्मचाऱ्यांची संख्या आधीच कमी करण्यात आली होती. दुबई मीडिया ऑफिसने त्यांच्या ‘X’ हँडलवर माहिती दिली की, या ड्रोन हल्ल्यामुळे दूतावासाजवळ आग लागली होती, जी विझवण्यात आली आहे. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.

संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकन दूतावासावर झालेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. यापूर्वी सोमवारी रियाधमधील अमेरिकन दूतावासावर संशयास्पद इराणी ड्रोन हल्ला झाला होता. सौदी संरक्षण मंत्रालयानुसार, त्या हल्ल्यामुळे मर्यादित आग लागली होती आणि किरकोळ नुकसान झाले होते.

याआधी कुवेतमधील अमेरिकन दूतावासावरही इराणी ड्रोनने हल्ला केला होता. मंगळवारी, एक्सिओसचे (Axios) रिपोर्टर बराक राविद यांनी कळवले की, युएईच्या अनेक शहरांवर इराणने केलेल्या हल्ल्यांनंतर युएई आता इराणवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा विचार करत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांच्या हवाल्याने एक्सिओसने हा अहवाल दिला आहे.
अहवालात नमूद केलेल्या एका सूत्राने सांगितले की, “युएई इराणविरुद्ध सक्रिय बचावात्मक पावले उचलण्याचा विचार करत आहे. युएई कोणत्याही प्रकारे युद्धात सामील नसतानाही, त्यांना आतापर्यंत ८०० प्रक्षेपास्त्रांचा (projectiles) सामना करावा लागला आहे.”