Chinese farmer finds treasure inside duck: सोन्याची अंडी देणारी कोंबडी! अशा अर्थाची एक म्हण मराठीत प्रचलित आहे. पण, कोंबडी नव्हे तर बदकाच्या पोटात सोन्याचा खजिना सापडल्याची एक घटना चीनमधून समोर आली आहे. हुनान प्रांतातील लोंगहुई काउंटीमधील लिऊ या शेतकऱ्याच्या घरी ही घटना घडली आहे. लिऊ यांना बदकाच्या पोटात १,६२,००० रुपये किंमतीचे सोन्याचे कण सापडले आहेत.

१० ग्रॅम सोने

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. हुनान प्रांतातील लोंगहुई काउंटीमधील लिऊ यांनी फेब्रुवारीमध्ये घरी चिकनचा बेत ठरला म्हणून बदक कापण्याचा निर्णय घेतला. बदक कापल्यानंतर त्याच्या पोटात खरेखुरे सोन्याचे कण आढळून आले. सापडले सोन्याचे कण १० ग्रॅम वजनाचे असून, त्याची बाजारातील किंमत एक लाख ६२ हजार एवढी आहे.

सोन्याच्या खाणीत वावर

लिऊच्या वडिलांनी ही घटना म्हणजे येत्या वर्षासाठी एक शुभ संकेत असल्याचे म्हटले आहे. बदके पूर्वी सोन्याच्या खाणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नदीजवळ वावरत होती. कदाचित त्यांनी सोने कण खाल्ले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सोन्याचे कण खाल्ल्यास ते पचत नाहीत पण विष्टेद्वारे ते बाहेर पडतात. पण, बऱ्याचवेळा सोन्याचे अनेक कण पोटात साठून राहतात व ब्लॉकेज निर्माण होण्याचा प्राणी आणि मानवांमध्येही धोका असतो, असे तज्ज्ञ सांगतात.

यापूर्वी सोने आढळून आल्याची नोंद

यापूर्वी देखील गावात अशाप्रकारे बदकांच्या पोटात सोन्याचे कण आढळून आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे लिऊ यांनी नमूद केले आहे. लोंगहुई काउंटीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सापडलेल्या सोन्याच्या कणांची तपासणी करुन ते खरे आहेत का? याची पडताळणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. नदीतील वाळू चाळून अनेकांना सोन्याचे कण सापडल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सोन्यावर मालकीहक्क कोणाचा

लिऊ यांना बदकाच्या पोटात सापडलेल्या सोन्याचा मालकीहक्क निश्चित करणे किचकट ठरु शकते, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे सोने गोळा करण्याची पद्धत प्राचीन असल्याचेही त्यांनी नमूद केले. पूर्वी अनेकजण बदक आणि घूस यांच्या विष्ठेतून सोन्याचे कण गोळा करत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हुनान प्रांतात सोन्याचा दर प्रतिग्रॅम १४,८५० ते १५,४८० रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.