कोरोना या जीवघेण्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधून प्रसार झालेल्या या विषाणूचा आता व्यापार जगतावरही परिणाम दिसायला सुरूवात झालीये. किमान भारतातील इलेक्ट्रिक कंपन्यांचं हेच म्हणणं आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात आयात केले जाणारे साहित्य आणि सूटे भाग (कंपोनेंट्स) यांच्यावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे भारतात उत्पादनात कपात आणि नव्या उत्पादनांच्या लाँचिंगमध्ये उशीर होणार असल्याचं स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी म्हटलंय. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सूटे भाग आयात होण्यासाठी जेवढा उशीर होईल तितका अधिक परिणाम इलेक्ट्रॉनिक उद्योगावरही होणार आहे.

टेलिव्हिजन तयार करण्यासाठी वापरले जाणारे जवळपास 75 टक्के कंपोनेंट्स आणि स्मार्टफोन कव्हर्सचे 85 टक्के कंपोनेंट्स चीनमधून येतात. यामध्ये मोबाइल डिस्प्ले, ओपन सेल टीव्ही पॅनल, मुद्रित सर्किट बोर्ड, कॅपेसिटर, मेमरी आणि एलईडी चिप्स यांसारखे कंपोनेंट्स चीनमधून आयात केले जातात. याशिवाय एअर कंडीशनर कंप्रेसर्स आणि वॉशिंग मशीनच्या मोटर्सची आयातही चिनी कंपन्यांद्वारे केली जाते.

इलेक्ट्रिक उपकरणांच्या किंमती वाढण्याची शक्यता :
बाजाराच्या सद्यस्थितीनुसार चिनी कंपन्यांनी कंपोनेंट्सच्या किंमतीत 2-3 टक्के वाढ केली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर कंपोनेंट्सच्या किंमतीत अजून वाढ केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी भारतात इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ होऊ शकते. चीनमध्ये नववर्षाची सुट्टी ३१ जानेवारीपर्यंत होती, पण आता तेथील सुट्टी ९ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिवाय यात अजून वाढ होऊ शकते. त्यामुळेही उत्पादनावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपोनेंट्सची कमतरता भरुन काढण्यासाठी चीनला पर्याय शोधण्याबाबतही अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी बुधवारी म्हटलं होतं.

कोरोना व्हायरसचे चीनमध्ये थैमान –
कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून तेथे आतापर्यंत एकूण १३० हून अधिक जणांना मृत्यू झालाय. मध्य हुबेई प्रांतात एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, विषाणूची लागण झालेल्या निश्चित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली असून पुढील दहा दिवसांत चीनमधील परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ५९७४ रुग्णांच्या चाचण्या सकारात्मक आल्याचे म्हटले असून त्यांना कोरोना विषाणूने न्यूमोनिया झाला आहे. मंगळवारी एकूण ३१ प्रांतांत या विषाणूचा प्रसार झाल्याचे दिसून आले. एकूण १३२ लोकांचा यात बळी गेला असून हुबेई प्रांतात ३५५४ निश्चित रुग्ण आहेत. वुहान ही या प्रांताची राजधानी आहे. या प्रांतात एकूण १२५ बळी गेले आहेत. १२३९ रुग्ण गंभीर स्थितीत असून एकूण ९२३९ संशयित रुग्ण आहेत. हुबेई प्रांतात ८४० नवे रुग्ण सापडले असून विषाणू खूप वेगाने पसरत चालला आहे. जे लोक यात मरण पावले ते साठ वयावरचे आहेत. त्यांना आधीपासून इतरही काही रोग होते. मानवी संपर्कातूनही हा विषाणू पसरत असून या विषाणूचा प्रादुर्भाव दहा दिवसांत जास्त वाढणार असल्याचा इशारा श्वसन रोग तज्ज्ञ झोंग नानशान यांनी दिला आहे. चीनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय पथकाचे नानशान हे प्रमुख आहेत. लवकर निदान व वेगळे ठेवणे हे दोन मार्ग यावर सध्या उपयुक्त आहेत. ताप व अशक्तपणा ही लक्षणे या रोगात दिसत असून १० ते १४ दिवस रुग्णाला वेगळे ठेवणे गरजेचे आहे. २०१७ मध्ये वटवाघळात जे विषाणू सापडले होते तसाच आताचा विषाणू असून तो वन्य प्राण्यातून आलेला आहे. सिव्हियर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) हा रोग सहा महिने चालला होता पण आताचा न्यूमोनिया प्रसार तेवढा काळ राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. ५५ उपमार्गावरील केंद्रात लोकांचा ताप मोजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून त्याने आता भारतातही शिरकाव केल्याची चिन्हे आहेत. या जीवघेण्या विषाणूने होणाऱ्या आजाराची लक्षणं असलेले काही संशयित मुंबई आणि पुण्यात आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.