जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली असली तरी त्याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे. मात्र, जेव्हापासून ओमायक्रॉनबद्दल विविध बातम्या येऊ लागल्या आहेत, तेव्हापासून देशात लसीकरणात वाढ झाली आहे. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे नागरिक लसीकरण केंद्रात जाऊन लस टोचवून घेत आहेत. 

लसीकरण डेटावर नजर टाकल्यास असे दिसून येते की गेल्या १३ दिवसांत त्याच्या मागच्या १३ दिवसांच्या तुलनेत दुसऱ्या डोसच्या वापरामध्ये जवळपास १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर एकूण लसीकरणातही १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. CoWIN डॅशबोर्डवरील आकडेवारी दर्शवते की १२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान ५,८७,२०,७३८ जणांना लसीचा दुसरा डोस दिला गेला होता. तर ही संख्या २५ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबर दरम्यान ६,८८,९१,९१३ वर पोहोचली. म्हणजेच एकूण १५.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. याच कालावधीत, एकूण लसीकरणात सुमारे १५.२ टक्क्यांनी वाढ झाली जी १२-२४ नोव्हेंबर दरम्यान ८,५४,८७,७६९ वरून २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान ९,९५,५४,१९२ पर्यंत वाढली.

करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत सापडला. या प्रकारामुळे करोनाचा प्रसार वेगाने होतो, त्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण तयार झालंय. करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनमध्ये ५० पेक्षा जास्त म्युटेशन झाले असून तो जास्त वेगाने प्रसारित होतो, असं म्हटलं जातंय.

राज्यातील लसीकरणात वाढ..

ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या उत्परिवर्तीत विषाणूच्या भीतीमुळे गेल्या आठवडाभरात लस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ओसरलेला लसीकरणाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या भीतीमुळे लसीकरणाचा वेग वाढत आहे. तसेच आता घरोघरी लसीकरणाचा पाठपुरावा केला जात असल्यामुळे लसीचा दुसरा डोस न घेतलेले लोक लस घेत आहेत, अशी माहिती आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.