Duronto Express delivery train baby birth : नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या ३६ वर्षीय अंजुम बानो वसीम अख्तर यांनी तब्बल चार तास प्रसूतीच्या वेदना सहन केल्या. त्यांच्यासोबत त्यांच्या ११ आणि ८ वर्षांच्या दोन मुलीही होत्या. २४ जून रोजी रात्री सुमारे १० वाजल्यापासून त्यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यांनी जवळपास पहाटे २ वाजेपर्यंत कोणालाही याची कल्पना दिली नाही. त्यावेळी रेल्वे जळगाव जिल्ह्यातील भुसावळजवळून वेगाने धावत होती आणि पुढे तातडीचा कोणताही थांबा नव्हता. सहप्रवाशांनी वारंवार रेल्वे हेल्पलाइन १३९ वर संपर्क साधला, मात्र मदत पुढील स्थानकावरच मिळेल, असं सांगण्यात आले. पण प्रसुती कळा थांबणं शक्य नव्हतं.

असह्य वेदना अन् गर्भशयातील पाण्याची पिशवी फुटली

याच वेळी या ट्रेनमधील एस -५ डब्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या २७ वर्षीय स्टाफ नर्स मिनू भैसरे यांनी पुढाकार घेतला. मिनू भैसरे म्हणाल्या, “वेदना असह्य झाल्यानंतरच अंजुम यांनी आजूबाजूच्या प्रवाशांना याची माहिती दिली. मी त्यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा गर्भाशयातील पाण्याची पिशवी फुटली होती आणि बाळाचं डोकं बाहेर येऊ लागलं होतं. पुढील १५ ते २० मिनिटे वैद्यकीय मदतीची वाट पाहणं अशक्य होतं.” इंडियन एक्स्प्रसेने याबाबतचे सविस्तर वृत्त दिलं आहे.

त्यानंतर त्यांनी उपलब्ध असलेल्या अत्यंत मर्यादित साधनसामग्रीच्या मदतीने धावत्या ट्रेनमध्येच प्रसूती केली. दरम्यान, सहप्रवाशांनी साईड लोअर बर्थभोवती चादरी लावून तात्पुरता प्रसूती कक्ष तयार केला. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका नर्सिंग विद्यार्थिनीनेही मिनू यांना मदत केली.

हातमोजे नाहीत, कात्री नाही, तरीही धावत्या ट्रेनमध्ये केली प्रसूती

मिनू भैसरे सांगतात, “आमच्याकडे डिलिव्हरी किट नव्हतं, हातमोजे नव्हते, कात्री नव्हती, निर्जंतुक ब्लेड नव्हतं, काहीच नव्हतं. नाळ कापण्यासाठी मी प्रथम कोणाकडे नवीन रेझर ब्लेड आहे का, अशी विचारणा केली; मात्र कोणाकडेच नव्हते. अखेर एका प्रवाशाने मला चाकू दिला. माझ्याकडे असलेल्या हँड सॅनिटायझरने तो व्यवस्थित निर्जंतुक करूनच त्याचा वापर केला.”

नाळ कापायला दोरा वापरला

आईकडे असलेल्या दोऱ्याने त्यांनी नाळ बांधून कापली. त्यानंतर अपरा (प्लेसेंटा) बाहेर काढला. पाणी, कापूस आणि नॅपकिनच्या साहाय्याने आई आणि नवजात बाळाला स्वच्छ केलं. त्यानंतर नवजात मुलीला आईच्या छातीवर ठेवून स्तनपान सुरू केलं. “हे सर्व धावत्या ट्रेनमध्ये घडलं. माझे एकमेव ध्येय आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहावेत, हेच होतं”, असं त्यांनी सांगितले.

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अहवालानुसार, ट्रेन पहाटे सुमारे २ वाजून ५० मिनिटांनी चाळीसगाव स्थानकात पोहोचल्यानंतर रेल्वे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अंजुम, त्यांची नवजात कन्या आणि त्यांच्या दोन मुलींना रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगितलं. नागपुरात असलेल्या त्यांच्या दिव्यांग पतीलाही फोनवरून याची माहिती देण्यात आली.

मिनू भैसरे म्हणाल्या, “मला भीती वाटली नाही. त्या क्षणी त्यांना मदत करणारे दुसरं कोणीही नव्हतं. त्या अनेक तास प्रसूतीच्या वेदना सहन करत होत्या आणि पूर्णपणे थकल्या होत्या. एक नर्स म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडायचं होतं.” नंतर त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांमार्फत आई आणि बाळाची प्रकृतीही जाणून घेतली.

ट्रेनमधील प्रथमोपचार किट अपुरी

ट्रेनमधील प्रथमोपचार पेटीत केवळ तापाची औषधे, कापूस आणि काही सिरिंज एवढीच सामग्री असल्याचं सांगत मिनू म्हणाल्या, “किमान प्रसूतीसाठी आवश्यक असलेले मूलभूत आपत्कालीन साहित्य तरी प्रत्येक ट्रेनमध्ये असायला हवं.”

सध्या नागपुरात आपल्या कुटुंबासोबत असलेल्या अंजुम बानो म्हणाल्या, “मी खूप घाबरले होते. मला वाटलं होतं की मी आणि माझं बाळ दोघेही वाचणार नाही. पण अल्लाहने योग्य वेळी नर्स मिनू यांना माझ्यासाठी पाठवलं. त्यांनी धावत्या ट्रेनमध्ये माझी सुरक्षित प्रसूती करून माझे आणि माझ्या मुलीचे प्राण वाचवले. आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी राहू. त्या आता आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. माझी मुलगी मोठी झाल्यावर मी तिला ही कहाणी नक्की सांगणार.”

बॉम्बे हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. राजकुमार पाटील यांनी मिनू भैसरे यांच्या कार्याचं कौतुक करत, प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेली त्यांची वैद्यकीय कौशल्ये आणि मानवतेची भावना अनुकरणीय असल्याचे म्हटले. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रत्येक ट्रेन व्यवस्थापकाकडे प्रथमोपचार पेटी असते. त्यात ड्रेसिंग साहित्य, बँडेज, अँटिसेप्टिक क्रीम, पॅरासिटामॉल आणि इतर काही मूलभूत औषधे असतात. प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास नियंत्रण कक्षाला माहिती दिली जाते आणि पुढील स्थानकावर रुग्णवाहिका तसंच रेल्वे डॉक्टर किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयाची व्यवस्था केली जाते.

या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, नागपूरहून सुटलेल्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाने ट्रेन व्यवस्थापकाला गर्भवती महिलेबाबत माहिती दिली. सहप्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित प्रसूती पार पडली आणि त्यानंतर पुढील स्थानकावर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली.

अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, रेल्वेचे मुख्य कार्य प्रवाशांची वाहतूक करणे आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून शक्य ती सर्व मदत केली जाते. मात्र हातमोजे, निर्जंतुक ब्लेड किंवा प्रसूतीसाठी आवश्यक प्रगत साहित्य प्रत्येक ट्रेनमध्ये उपलब्ध करून देणे हा धोरणात्मक निर्णयाचा विषय असल्याचं त्यांनी नमूद केले.