पीटीआय, नवी दिल्ली
देशभरात ‘ई-२०’ पेट्रोलमुळे वाहन बिघाडाच्या तक्रारी समाजमाध्यमातून समोर येत असताना, केंद्र सरकारने गुरुवारी ‘ई-२०’मुळे इंधन कार्यक्षमतेत दोन ते सहा टक्क्यांनी घट होऊ शकते, असा दावा केला. मात्र त्याचबरोबर ई-२० इंधन वाहनांसाठी सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरणही दिले.
वाहनाचा प्रकार आणि जुने-नवेपणा यानुसार ‘ई-२०’मुळे इंधन कार्यक्षमतेत दोन ते सहा टक्क्यांनी घट होऊ शकते. मात्र शक्तिमापकावरील (डायनॅमोमीटर) इंजिनाच्या टिकाऊपणाची चाचणी आणि रस्त्यावरील वाहन चाचण्यांमध्ये ‘ई-२०’मुळे वाहनात कोणतेही बिघाड आढळले नाहीत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत स्पष्ट केले. ‘ई-२०’मुळे ‘ई-१०’च्या तुलनेत चांगला वेग, प्रवास दर्जात सुधारणा आणि कार्बन उत्सर्जनात सुमारे ३० टक्के घट होते, असा दावाही गडकरी यांनी केला.
केंद्र सरकारने गुरुवारी त्यांच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचे समर्थन केले. व्यापक चाचण्या आणि मोठ्या प्रमाणावरील प्रत्यक्ष वापरातून ‘ई-२०’ पेट्रोलमुळे इंजिनची झीज, गंज किंवा वाहनाचे आयुर्मान कमी होत असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. उलट या कार्यक्रमामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून जागतिक तेलाच्या किमतीतील चढ-उतारांपासून ग्राहकांना दिलासा मिळाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम हा टप्प्याटप्प्याने आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित पद्धतीने राबवण्यात आला आहे. यासाठी निती आयोग, वाहन उत्पादक कंपन्या, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम), तेल विपणन कंपन्या (ओएमसी) आणि इतर तांत्रिक संस्थांशी चर्चा करण्यात आल्याचे लोकसभेत लेखी उत्तर देताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले.
‘एआरएआय’, ‘एसआयएएम’, इंडियन ऑइल कॉर्प (आयओसी), इंडियन इ्स्टिटट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि वाहन उत्पादकांनी केलेल्या प्रयोगशाळा अभ्यास आणि मैदानी चाचण्यांमध्ये ‘ई-२०’ इंधन विहित मानकांनुसार वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच जुन्या वाहनांच्या कामगिरीतही ‘ई-२०’मुळे कोणताही लक्षणीय फरक दिसून आला नाही, असा दावा मंत्री गोपी यांनी केला.
इथेनॉल मिश्रणामुळे मोठ्या प्रमाणात इंजिन बिघाड किंवा वाहन बंद पडल्याचा कोणताही पुरावा नाही. इथेनॉल मिश्रणामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि विनिमय दरातील चढ-उतारांचा धोका कमी झाला आहे. – सुरेश गोपी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री
