पीटीआय, नवी दिल्ली: देशात शुक्रवारपासून ‘फ्लेक्स फ्युएल’ वाहनांसाठी ‘ई-८५’ या इंधनविक्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला देशातील निवडक पेट्रोल पंपांवर ते विक्रीसाठी उपलब्ध असेल, तसेच ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर २० रुपये सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असेल. ‘फ्लेक्स फ्युएल’ म्हणजे एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनांवर चालण्यास सक्षम इंजिन असलेले वाहन.
आंतरराष्ट्रीय पर्यावरणदिनाच्या निमित्ताने केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील एका इंडियन ऑइलच्या विक्री केंद्रावर ई-८५ची विक्री सुरू करण्यात आली. शुक्रवारी देशात ४८ पेट्रोल पंपांवर ई-८५ उपलब्ध करून देण्यात आले. या वर्षाअखेरीस ५०० आणि पुढील वर्षाअखेरीस ५,००० पेट्रोल पंपांवर ई-८५ देण्याची योजना आहे.
ई-८५मध्ये ८० ते ८५ टक्के इथेनॉल आणि १४ ते १९ टक्के पेट्रोल असते. ते केवळ ई-२० ते ई-१०० या श्रेणीतील इथेनॉलमिश्रित इंधनावर चालू शकणार्या ‘फ्लेक्स फ्युएल’ वाहनांमध्ये वापरता येते. ‘ई-८५’च्या विस्तारामुळे २०३०-३१पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्र्रमाण २६ टक्के होण्याची अपेक्षा आहे.
अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा
श्री विजयपुरम : ‘ऑइल इंडिया लिमिटेड’ कंपनीला अंदमानच्या समुद्रात पुन्हा नैसर्गिक वायूचा मोठा साठा शोधण्यात यश आले आहे. या नव्या यशामुळे अंदमानचा हा सागरी भाग आगामी काळात देशातील प्रमुख हायड्रोकार्बन उत्पादक क्षेत्र म्हणून उदयास येण्याची शक्यता वाढली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या समुद्रमंथन मोहीम योजनेअंतर्गत यश मिळाल्याचे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.
अंदमान बेटांच्या पूर्व किनारपट्टीपासून समुद्रात सुमारे १५ किलोमीटर अंतरावर, ३५५ मीटर पाण्याच्या खोलीवर असलेल्या विजयपुरम-३ या शोध विहिरीमध्ये हा वायू साठा सापडला आहे. कंपनीने या भागात आतापर्यंत एकूण तीन शोध विहिरींचे उत्खनन केले असून, त्यापैकी दोन विहिरींमध्ये नैसर्गिक वायू आढळून आला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये विजयपुरम-२ विहिरीमध्ये पहिल्यांदा नैसर्गिक वायूचा साठा सापडला होता. त्यानंतर काही महिन्यांतच सापडलेला हा दुसरा मोठा साठा भारताच्या ऊर्जा मोहिमेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
