दक्षिण पाकिस्तानात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. गुरुवारी (७ ऑक्टोबर) पहाटे बलुचिस्तान प्रांतात झालेल्या ५.७ तीव्रतेच्या भूकंपामुळे सुमारे २० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घरांची छप्परं आणि भिंती कोसळल्याने येथे मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे. यावेळी दुर्गम पर्वतीय शहर हरनई हे भूकंपाने सर्वात जास्त प्रभावित झालेलं क्षेत्र ठरलं आहे.

“आम्हाला या भूकंपामुळे २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे”, असं बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर झिया उल्लाह लंगौ म्हणाले. दरम्यान, या २० मृतांमध्ये एक महिला आणि सहा लहान मुलांचाही समावेश आहे. प्रांतीय सरकारचे वरिष्ठ अधिकारी सुहेल अन्वर हाश्मी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की, “या दुर्घटनेत २०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत”.

शासकीय रुग्णालयात नाईलाजाने दिव्यांशिवाय काम

बचाव कार्यात जखमींना बाहेर काढण्यासाठी आम्ही लवकरच हेलिकॉप्टर पाठवत आहोत, अशी माहिती देखील हाश्मी यांनी दिली. तर, बलुचिस्तानच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख नसीर नासर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार मृतांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. भूकंपामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे, आरोग्य कर्मचारी सकाळ होईपर्यंत अपुऱ्या सुविधांसह शासकीय रुग्णालयात नाईलाजाने दिव्यांशिवाय काम करत होते.

४० लोक गंभीर जखमी

“सकाळ होईपर्यंत आम्ही टॉर्च आणि मोबाईल फ्लॅश लाइट्सच्या मदतीने विजेशिवाय काम करत होतो,” असं हरनाईच्या सरकारी हॉस्पिटलमधील वरिष्ठ अधिकारी जहूर तरिन यांनी एएफपीला सांगितलं. “बहुतेक जखमी लोकांना फ्रॅक्चर झालं आहे. तर १० ते १२ जणांना आम्ही प्राथमिक उपचारानंतर परत पाठवलं आहे. मात्र, ह्यात किमान ४० लोक गंभीर जखमी झाले आहेत”, अशीही माहिती त्यांनी दिली.

राजधानी क्वेटालाही भूकंपाचे धक्के

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितलं की, या भूकंपाची तीव्रता ५.७ इतकी होती. यावेळी बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेटा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.