चीनच्या दक्षिण पश्चिम भागाला सोमवारी दोन शक्तिशाली भूकंपांनी हादरविले. या भूकंपामुळे सुमारे ७५ नागरिक ठार झाले असून ४१२ हून अधिक जखमी झाले. तिबेटला लागून असलेल्या चीनच्या पर्वतीय भागात हे भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपामुळे भूस्खलन होऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सकाळी एक मिनिट जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्रबिंदू २० किमी खोल असल्याचे चीनच्या भूकंप अभ्यास केंद्राने सांगितले.
गान्सू प्रांतातील मिनक्झिआन आणि झँगक्झिआन भागांना ६.६ आणि ५.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरविले. त्यानंतर तब्बल ४०० धक्केजाणवल्याचे येथील सरकारी प्रवक्ते चँग झेंगगुओ यांनी सांगितले. तर क्झिनुआ या सरकारी वृत्तसंस्थेने या भूकंपात ७५ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मृतांमध्ये वयस्कर आणि मुलांचा अधिक समावेश आहे.
या भूकंपांच्या धक्क्यांमुळे १,२०० घरे पडली असून २१ हजारांपेक्षा अधिक घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपानंतर तीन हजार अग्निशमन दलाच्या गाडय़ा, सशस्त्र पोलीस, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. भूकंपानंतर सतत जाणवणाऱ्या धक्क्य़ांमुळे तसेच भूस्खलनामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याचवर्षी एप्रिलमध्ये झालेल्या भूकंपानंतरची ही मोठी दुर्घटना आहे. सिचुआन प्रांतात झालेल्या ७ रिश्टर स्केल भूकंपात तब्बल २०० जणांचा बळी गेला होता.
दरम्यान, सोमवारी झालेल्या भूकंपानंतर तातडीने मदतकार्य सुरू करून दुर्घटनास्थळावरून जास्तीत जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे आदेश चीनचे अध्यक्ष  जिनपिंग यांनी प्रशासनाला दिले आहेत.